Friday, 2 December 2016

जिच्या हाती पाळण्याची दोरी.....

जिच्या हाती पाळण्याची दोरी । तिच जगाते उद्धारी ।

ऐसी वर्णिली मातेची थोरी । शेकडो गुरूहुनिहि ।।

                       - संत तुकडोजी महाराज

[ग्रामसंजीवणी विषेशांकामध्ये प्रकाशित. दि. ८ जानेवारी १७]


      राष्ट्रसंत सांगतात की "जिच्या हाती पाळण्याची दोरी" म्हणजे आई ! तिच जगाचा उद्धार करु शकते. कारण ती शंभर गुरु पेक्षाही महान आहे. आईची महती वर्णावी तेवढी कमी आहे. आईने जन्म दिलेलं प्रत्येक मुल हा तिचा काळजाचा तुकडा असतो. तिचा हा काळजाचा तुकडा जगातला सर्वश्रेष्ठ व्यक्ती असावा. असे प्रत्येक आईला वाटत असते. त्या साठी ती त्याला नित्य-सुंदर-सत्य संस्कार देत राहते. साने गुरुजी ह्यांनी लिहलेल्या शामची आई ह्या पुस्तकातुन आईने आपल्या मुलांवर कशा प्रकारे संस्कार करायला पाहिजे. याचे यथार्थ दर्शन त्यातुन दिले आहे. बाळ जेंव्हा आईच्या पोटात असतं तेंव्हा पासुन ते नऊ महिने पुर्ण पोषण आई करते. गर्भातुन बाहेर येण्याच्या प्रक्रियेला आपण जन्म झाला संबोधतो. मोठ्या उत्साहाने व आनंदाने त्याचे जगात आगमण होते. आईशी जुळलेली नाळ ज्यावेळी कापल्या जाते तेंव्हा त्याच्या पोषणाची जबाबदारी त्याच्या शरिरावर येते व कुठेतरी स्वतंत्र असल्याचा भास निसर्ग त्याला करून देते. जर अगदी लहान वयातच त्या बाळावर आई कडून चांगले संस्कार झाले तरच ते बाळ जगाचे कल्याण करु शकते. तुकडोजी महाराज म्हणतात.

प्रल्हादाची कयाधु आई । छत्रपतींची जीजाबाई ।
कौसल्या देवकी आदी सर्वहि । वंदिल्या ग्रंथी ।।

      ज्या मातेचे पुत्र जनकल्यानासाठी झिजले, ज्यांच्या कर्तुत्वाने ही धरा धन्य झाली. अशा सर्व पुत्रांच्या मातांना ग्रंथामध्ये अजरामर स्थान आहे. प्रल्हादाची कयाधु आई काय वर्णावी तिची थोरवी.  तर शुर विर छत्रपती शिवाजी महाराजांची माता जीजाऊ ज्यांच्या अमोल मार्गदर्शनाने स्वराज्य निर्माण झाले. महाराष्ट्राने स्वतंत्र जगण्याचा अनुभव घेतला. कृष्ण अर्जुनाच्या महाभारतातल्या गोष्टी सांगुन स्वतंत्र राष्ट्र निर्मिती केली. कौसल्या व देवकी ह्याची प्रचिती आपणास ईतिहासाने करून दिलीच आहे. घरादारामध्ये नवचैतन्य जागं करणारी ही स्त्री माताच असते. ज्याची बरोबरी जगातला कुठलाच पुरुष करु शकत नाही.
        हे जरी सत्य असले तरी राष्ट्र संतांच्या विचारावर आज आपण खरच आहोत का ह्याचाही विचार होणे आवश्यक आहे. आज खुन, बलात्कार, भ्रष्टाचार करणारे सुध्दा कुणा मातेचे पुत्र असणार. तेंव्हा त्या मातेच्या परिस्थीतीचा अभ्यास करणे, आढावा घेणे महत्वाचे आहे. आजही स्त्री भृण हत्या व महिलांवर होणार्या अत्याचाराने देश ग्रासला आहे. त्यांच्या जाणिवांवर, शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. पुरुष प्रधान संस्कृतीचे बळी ठरलेल्या अनेक महिलांच्या वार्ता आपण ऐकतो आहोत तेंव्हा राष्ट्रसंत म्हणतात

स्री पुरुष ही दोन चाके । परस्पर पोषक होता निके ।
गाव नांदेल स्वर्गीय सुखे । तुकड्या म्हणे ।।

       म्हणजे संसाराच्या गाडीचे स्त्री आणि पुरुष ही दोन्ही चाके आहे त्यातले  एक जरी  चाक कमी किंवा कमजोर असलं तर गाडी पुढे जाणार नाही. तो संसार उध्वस्त झाल्या बिगर राहणार नाही. त्यासाठी स्त्रीयांना योग्य सन्मान जो पर्यंत मिळणार नाही तो पर्यंत ह्या समाजाची प्रगती होणे शक्य नाही. कुठल्याही परस्रीकडे वाकड्या नजरेने बघु नये. तिला बहिण किंवा मातेच्या रुपात बघावे असे संताचे वचन कुणीही पाळतांना दिसत नाही. ऊलट भर दिवसा कुणाचीही मुलगी सुरक्षित नाही. समाजातील काही नराधम एकट्या स्रीला बघताच तिची बेअब्रु करतात. चिमुकल्यांना सुध्दा अशा पशु मानवांनी सोडले नाही. घरातील स्री ही समाजाचे ऋण फेडण्यास महत्वाची कामगिरी बजावते व मानव समाज संतुलीत ठेवण्यास ही प्रथम कारणीभुत ठरते. म्हणुन राष्ट्र संतानी सांगितले आहे की,

म्हणोनि विधिने सेवन उचित बोलीले । महिले विन विश्व न चाले ।
काय होते पुरुषाने केले ? अभद्र झाले घर सारे ।।

          समाजाच्या प्रत्येक अंगात स्री शक्तीचा वास आहे. प्रत्येकच जीव हा स्री तत्वाशिवाय अपुर्ण आहे. स्रीने ठरविले तर जगाचे उत्थान होते. पुरुष एकटा काहीही करू शकत नाही. आपण म्हणतो प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे एक स्री असते परंतु तिला त्या यशाचे कारण समजणारे किती पुत्र व किती पुरुष आहेत ? हाही चिंतनाचा विषय ठरु शकतो. स्री ला नुसते भोग वस्तु ज्यांनी समजले आणि नुसती कळसुत्री बाहुली बनवुन ठेवले. त्या घरची स्री ही अबला ठरते. मग ती जगाचा उद्धार कशी करणार. बांधुन ठेवलेल्या सर्कशीतल्या प्राण्याला वाट्टेल तशी कृती करतांना पाहुन त्याच्या हुषारीवर नवल करता येईल कारण ते प्राणीच करू शकतो पण माणव नाही. माणव हा स्वतंत्र अस्तीत्व घेवुन जन्म घेतो त्याला बंदी किंवा त्याला गुलाम ठेवता येत नाही. ते शहाण्यांना शोभेल असे कृत्य नाही. तर जे स्वार्थाने अंध आहेत असेच लोक हे दृष्कृत्य करू शकतात.

म्हणती स्री ही गुलामची असते । तीला हक्क नाही उध्दराया पुरते ।
हे म्हणने शोभेना शहाण्याते । स्वार्थांधतेचे ।।

         स्वार्थाने  बरबटलेल्या कुविचाराने माखलेल्या ह्या समाजाने सर्वप्रथम स्री जातीचा सन्मान करणे शिकलं पाहिजे. मातेला माते समान, मुलीला मुलीसमान, बहिणीला बहिणी समान आणि स्वत:च्या अर्धांगिनीला सहचारिणी समान वागनुक दिल्या गेली पाहिजे. तेंव्हा समाज कुठेतरी विघटनापासुन वाचु शकेल व समाज आदर्श राष्ट्र निर्मिती साठी सक्षम ठरेल.
        जगातल्या सर्व गुरूंहुनही श्रेष्ठ गुरु आहे अशा माते सम सर्व स्रीला विनम्र अभिवादन...!!

      - किशोर तळोकार, ९६७३०६०७६२
risingkt@gmail.com

No comments: