◾महात्मा गांधीजींचे शिक्षणविचार !
[राष्ट्रातील प्रत्येक घर ही शाळा आहे. आणि घरातील मातापिता हे शिक्षक आहेत. - महात्मा गांधी ]
आज महात्मा गांधीजींची १५२ वी जन्मशताब्दी संपुर्ण भारतभर उत्साहाने साजरी केली जाते. त्यांचा जन्म पोरबंदर येथे २ ऑक्टोंबर १८६९ रोजी झाला. सत्य आणि अहिंसा ह्या दोन तत्वांच्या पलीकडेही गांधीनी देशाला मौलिक विचाराची देण दिली आहे. महात्मा गांधी हे आधुनिक विचारसरणीचे होते. बदलत्या काळात विचारप्रवाह सुद्धा त्याला सुसंगत असावे असे त्यांचे मत होते. खरंतर त्यांनी आचरणात आणलेली जीवनशैली अत्यंत श्रेष्ठ आहे. त्याच प्रमाणे त्यांनी मांडलेली शिक्षण विचारधारा अत्यंत जीवनाभिमुख, कृतिशील व व्यवहारी आहे. गांधीजीच्या मते शिक्षण म्हणजे "शरीर, मन आणि आत्मा यांचा विकास होय." केवळ साक्षर होणे म्हणजे शिक्षण नव्हे ; त्यांच्या मते व्यक्तिमत्वाचा संपुर्ण विकास साधने हेच शिक्षणाचे ध्येय्य असले पाहिजे. थोडक्यात महात्मा गांधींच्या विचार प्रणालीनुसार "शिक्षण म्हणजे माणूस घडविणे होय !"
गांधीजींच्या जीवनविषयक तत्वज्ञानाचे व्याहारिक स्वरूप म्हणजे त्यांचे शिक्षण विषयक विचार होय. गांधीजींच्या शैक्षणिक विचारात निसर्गवाद, आदर्शवाद व कार्यवाद यांचा समन्वय साधलेला दिसून येतो. गांधीजींनी पुस्तकी ज्ञानाला महत्व न देता कृतीद्वारे शिक्षणाचा पुरस्कार केला. मनुष्याचा सर्वांगिण व समतोल विकास साधण्याच्या दृष्टीने शिक्षणाचा विचार स्विकारावा हे कृतीतुन त्यांनी दाखवून दिले.
महात्मा गांधीनी आपले शिक्षण विषयक विचार हरिजन ह्या साप्ताहिकातून मांडले. त्यांच्या मते केवळ साक्षरता म्हणजे शिक्षणाची सुरुवात नाही तर माणसाच्या शारीरिक, माणसिक, अध्यात्मिक अंगामधील उत्कृष्टतेचा विकास व अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण होय. म्हणूनच गांधीजी साक्षरतेला सुरुवात व शेवट न मानता शिक्षणाच्या साधनापैकी एक साधन मानतात.
सर्वात प्रथम फिनिक्स आणि टॉलस्टॉय आश्रमात गांधीजीने शिक्षणाचा विचार केला. आश्रमात राहणारे त्यांचे कार्यकर्ते, सत्याग्रही, अनुयायी यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी कळत नकळत गांधीजींवर आली आणि आश्रमातच शिक्षणाचे प्रयोग सुरू झाले. तिथे त्यांनी शाळा चालवल्या. भारतामध्ये गांधीजी जेव्हा आले तेव्हा ते म्हणाले, स्वतंत्र भारतासाठी शिक्षण सुद्धा स्वतंत्र हवे आणि त्याचे स्वरूप कसे असावे याकरीता वर्धा येथे १९३८ साली शिक्षण परिषद बोलावल्या गेली. जमनालाल बजाज ह्यांनी पुढाकार घेतला. या शिक्षण परिषद मध्ये जाकीर हुसेन, आचार्य विनोबा भावे, आचार्य काकासाहेब कालेलकर, जगतराम देवीप्रसाद असे शिक्षणतज्ञांसमवेत शिक्षण परिषदेचे मुख्य नेतृत्व महात्मा गांधी करत होते. शिक्षणातुन स्वावलंबनाचे धडे मिळावे. शिक्षणाला व्यवहाराची व कृतीची जोड मिळावी ह्यासाठी मुलोद्योगी शिक्षणाची संकल्पना वर्धा येथे झालेल्या शिक्षण परिषदेमध्ये मांडली.
गांधीजींनी आपल्या शिक्षणविषयक विचारांची कार्यवाही मुलोद्योगी शिक्षणातून केली. मुलोद्योगी शिक्षणाला वर्धा शिक्षण, जीवन शिक्षण, बुनीयादी शिक्षा किंवा नयी तालीम इत्यादी नावाने ओळखल्या जाते. ही शिक्षण पध्दती जीवनाभिमुख होती आणि स्वालंबन स्वाभिमान व श्रमप्रतिष्ठा या तीन सुत्रांवर आधारीत होती.
ही शिक्षण विषयक संकल्पना भारतीय संस्कृतीवर आधारलेली असुन या योजनेत विद्यार्थ्याच्या मुलभूत गरजा व आवडींचा जवळचा संबंध असेल. या शिक्षणातून आजुबाजूच्या वातावरणाचे ज्ञान विद्यार्थ्यास प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना हस्तउद्योगास शिक्षण येथे दिले जाईल. ज्यामुळे तो त्याच्या जीवनातील उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम बनेल. शिक्षण हे स्वाश्रयी असावे. विद्यार्थ्यांनी शाळेत निरनिराळ्या वस्तू तयार कराव्यात व त्या वस्तू विकून जो पैसा येईल त्यातून शाळेचा खर्च अंशत: भागवला जावा. हे मुलोद्योगी शिक्षण पध्दतीचे वैशिष्ट्ये होते. महत्वाचे म्हणजे शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे. आणि ७ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना सक्तीचे शिक्षणाद्वारे शिक्षण मोफत असावे.
■ मुलोद्योगी शिक्षण पध्दतीचे उद्दीष्ट्ये
१) लोकशाही शासन पध्दतीमध्ये सुजान नागरिकाची भुमिका महत्वपुर्ण असते. शाळांमधून बालकांना आदर्श नागरिकत्वाचे धडे मिळावेत. आर्थिक, राजकिय, सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या आदर्श नागरिक निर्माण व्हावेत यासाठी मुलोद्योगी शिक्षण व्यवस्थेची मदत होईल.
२) आर्थिक स्वावलंबना अंतर्गत विद्यार्थी व संस्था यांचा विकास अभिप्रेत आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंमधून संख्येच्या खर्चातील काही भाग भरून काढणे व शिक्षण पूर्ण केल्या नंतर विद्यार्थ्याच्या उदर्निवाहची गरज भागविणे अशा दुहेरी दृष्टीकोनातून आर्थिक स्वावलंबनाचे उद्दीष्ट होते.
३) व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास म्हणजे सर्वोदय समाज ! जो समाज दोष व दुष्प्रवृत्तीपासून मुक्त असेल अशा समाजात त्याग, सहकार्य, सेवाभाव आत्मविश्वास आणि प्रेम अशा गुणांनी मुक्त व्यक्ती असलेल्या श्रमाला महत्व असेल.
४) विद्यार्थी ज्या गोष्टी शिकत आहे त्याचा संबंध घर, गांव आणि आजुबाजूच्या परिसराशी असणे गरजेचे आहे. शिक्षणाद्वारा जीवनाशी समन्वय साधने गरजेचे आहे.
■ मुलोद्योगी शिक्षणाची अध्यापन पध्दती
१) कृतीद्वारे शिक्षण : गांधी म्हणत खरे बौध्दिक शिक्षण हे शरीर अवयवांच्या हात, पाय, डोळे, नाक इत्यादी च्या योग्य वापरातून होऊ शकते. विशेषत: प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासासाठी या पध्दतीचा अवलंब करण्यात यावा.
२) स्वानुभवातून शिक्षण : बालक जेवढे अधिक स्वानुभव घेत जाईल तेवढेच त्याचे ज्ञान अधिक व्यापक होत जाईल. म्हणून जीवनाशी निघडीत असे अनुभव देऊन त्या अनुभवाद्वारे शिक्षण दिले जावे.
३) शिक्षणाच्या माध्यमातुन जीवनाशी समन्वय साधणे हे या शिक्षण पध्दतीचे वैशिष्ट्ये होते. त्यामुळे शिक्षणामध्ये अभ्यासल्या जाणाऱ्या विषयाचा जीवनाशी घनिष्ठ संबंध असावा. असे गांधी मानत. विषयाचे प्रथक ज्ञान देण्याऐवजी ज्ञान हे एक संध असावे अशा आंतर विद्याशाखीय शिक्षणाचे गांधी पुरस्कर्ते होते. या शिक्षण योजनेनुसार ज्या भागात शाळा असेल त्या भागातील व्यक्तिचीच शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात यावी असे अपेक्षित आहे. यासाठी प्रशिक्षित शिक्षकांना प्राधान्य देण्यात यावे असे नमूद केेले आहे. महात्मा गांधी हे बालकेंद्रीत शिक्षणाचे समर्थक होते. त्यांच्या तत्वानुसार शिक्षणप्रक्रियेत शिक्षकांचे स्थान मार्गदर्शक मित्र असे आहे. शिक्षक हा सहिष्णू, धैर्यशील, त्यागी, व उदारऱ्हदयी असावा.
आजच्या शिक्षण पध्दतेनेही मुलोद्योगी पध्दतीतील विचार स्विकारले आहेत. कृतीद्वारा शिक्षण व्यावसायिक शिक्षण समन्वय या तत्वांचा आज शिक्षणात अवलंब केला जातो. मुलोद्योगी शिक्षण योजना भारतीय शिक्षण प्रणालीला मिळालेली एक मौलिक भेट आहे. भारताच्या शिक्षण प्रणालीत अमुलाग्र बदल करण्याच्या हेतूने गांधीजींनी ही योजना मांडली. भारतीय कृषीधारीत अर्थव्यवस्था असल्याने कृषीला पुरक हस्त उद्योगाचे शिक्षण विद्यार्थ्यास दिले तर मनुष्यबळाचा योग्य वापर होऊन देशाच्या आर्थिक विकासालाही हातभार लागेल. असा गांधीजीचा कयास होता. अध्यात्मवाद निसर्गवाद कार्यवाद अशा त्रिवेणी संगमाचा अंगिकार असणारी ही योजना गरजाधिष्ठीत अभ्यासक्रमानुसार आधारीत होती. जगातील सर्वात उत्तम शिक्षण पद्धती ही फिनलँड देशाची मानली जाते. ह्या देशाची शिक्षण तत्त्वे मुलोद्योगी ह्या महात्मा गांधीजींच्या शिक्षण तत्त्वाशी मिळते त्यामुळे अशा परिणामकारक शिक्षण पध्दतीची समाजाला गरज आहे. ज्यातुन शिक्षणातुन निर्माण होणारी 'बेरोजगारी' सारखी भयानक समस्या थांबवता येईल.
■ किशोर तळोकार | ९६७३०६०७६२
==========
No comments:
Post a Comment