■ कोसला : अभिजात लेखनकृती
□ किशोर तळोकार ९६७३०६०७६२
गेली कित्येक वर्षे वाचनाला चांगलाच खंड पडलेला.. आणि वाचावं असं काही गवसलं नाही.. जे आहे त्याला वाचायला मननिवांत क्षणही नाही... रोजची धावपळ आणि प्रचंड व्यस्त करून ठेवलेली दैनंदिनी त्यामूळे बरच काही चांगलं वाचायचं सुटून जात होतं. ह्याची खंतही मनामध्ये घर करून बसली होती.. लॉकडाऊनचा योग आणि घरी बसून कोरोनाशी युध्द सुरु असतांना 'कोसला' गवसला. आधीच साहित्यातल्या सारस्वतांनी ह्यावर लेखणी सार्थकी लावल्या आहेच. टिकात्मक, सकारात्मक प्रतिक्रियाही लिहल्या असतांना इतक्या अभिजात कलाकृतीवर माझ्यासारख्यानं लिहणं म्हणजे सुर्याला गवसणी घालण्याचा प्रयत्न... तरीही थोडं धाडस करतो आहे.
ज्ञानपीठ पुरस्कार' विजेते लेखक भालचंद्र नेमाडे ह्यांचे "कोसला" हे पहिले पुस्तक. ही कादंबरी त्यांनी १९६३ मध्ये वयाच्या पंचवीसाव्या वर्षी अगदीच पंधरा दिवसात लिहून पूर्ण केली. देशमुख आणि कंपनीने हे पुस्तक प्रकाशित केलं तेव्हापासून या पुस्तकाच्या चोवीस आवृत्ती आणि अनेक पुनर्मुद्रणं प्रकाशित झाली आहेत. मराठी साहित्यात "कोसला" हे मैलाचा दगड ठरलं आहे. "कोसला"वर पीएचडी करणार्यांची संख्याही लक्षणीयच.! शिवाय "कोसला"चा साहित्यिक धांडोळा घेणारी आणि त्याचं साहित्यिक मुल्य मोजू पाहणारी जवळपास १०० च्यावर पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. "कोसला"ने त्याकाळी वाचकांना वेडं केलं होतं. अजूनही प्रकाशनानंतर सत्तावन्न वर्षांनी "कोसला"ची मोहिनी पूर्णपणे उतरलेली नाही.
मला एम ए मराठीला कोसला म्हणजे नेमाडे प्रकरण अभ्यासाला असल्याने ही कादंबरी वाचण्याची प्रचंड उत्सुकता लागली होती. मला ही कादंबरी खूप आवडली ती एका वेगळ्या अंगाने. बाकी "कोसला"ने जो इतिहास रचायचा होता तो कधीच रचला आहे. तरीही इतक्या गाजलेल्या कलाकृतीचा अनुभव कसा होता हे सांगीतल्याशिवाय चैन पडणार नाही म्हणून हा यत्न.! "कोसला"ची प्रामाणिक, मुक्त सडेतोड आणि अभिनव लेखणी शैली मला जास्त आवडली. ती देखील विशद करण्याचा थोडा प्रयत्न करतो.
"कोसला"चे कथानक बऱ्याचअंशी सगळ्यांनाच माहिती आहे. पांडुरंग सांगवीकर हा नायक खान्देशातल्या एका अगदी लहान खेड्यातून पुण्यात फर्ग्यूसन महाविद्यालयात बीएचं शिक्षण घ्यायला येतो. त्याची कौटुंबिक, सामाजिक आणि वैचारिक पार्श्वभूमी फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या एकूण संस्कृतीपेक्षा अगदीच वेगळी आहे. पुण्यातली जगण्याची पद्धत त्याच्या गावातल्या जगण्याच्या संकल्पनेपेक्षा अगदीच भिन्न आहे. पांडुरंग सांगवीकर या बदलांना कसा सामोरा जातो; अपयशाचा शिक्का कपाळी बसल्यानंतर पुन्हा गावात जाऊन पांडुरंग काय काय अनुभवतो आणि त्या अनुभवांना कसा सामोरा जातो; आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक घटनेविषयी, परिस्थितीविषयी, विचाराविषयी त्याच्या मनात अगदी खोलवर कुठ्ल्याप्रकारचे सूक्ष्म तरंग उठतात आणि तो एक स्वतंत्र विचार करू शकणारी व्यक्ती म्हणून प्रत्येक प्रसंगात कसा वागतो याचं मनस्वी चित्रण म्हणजे "कोसला" ही कादंबरी होय.
पांडुरंग सांगवीकर हे पात्र मला फार विलक्षण विनोदी वाटलं. त्यामध्ये उंदीर मारण्याच्या पराक्रमाच्या भागाचे लेखन प्रत्येक ठायी जीवंतपणा मांडून प्रसंग थेट काळजात ओतला आहे. जो प्रत्येकाला त्याच्या खोडकर मनातल्या उनाड मुलाची आठवण करून देणारा ठरतो. नायकाला उंदरांचा भयंकर राग असतो. हा राग त्यांनी प्रभावीपणे मांडला आहे. तसेच अनेक प्रसंग महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सचिवाची जबाबदारी पार पाडतांना केवळ आपल्याला भाषण देता यावं आणि चार लोकांसमोर बोलता यावं म्हणून पद स्विकारण्याचं धाडस.. त्यात घडलेल्या गंमतीजमती वाचून मला हसू आवरत नव्हते. एवढा शुध्द वेडेपणा आपणही त्या वयात केलेला आठवून जून्या आठवणींचा कप्पा हळूच उघडायला लागतो.
दुसरे म्हणजे एखाद्या परिस्थितीची किंवा घटनेची चीड आल्यानंतर ज्या माणसिककृती आपसूक पणे मनात कोलाहल निर्माण करते आणि वाईटसाईट असे बरेचसे विचार आपल्या मनात येऊन जातात. ह्याचे अतिशय प्रभावीपणे अगदी जसेच्या तसे विचार टिपण्याचा यशस्वी प्रयत्न झाला आहे. नायकाची पाच वर्षाच्या बहिणीचा देवीमुळे झालेला करुण मृत्यू, त्यामुळे नायकाला झालेलं दु:ख, घरच्यांचा आलेला संताप, तेंव्हा त्याच्या मनाला झालेल्या वेदना अगदीच सटीकपणे चित्रित केले आहे. घर जमीनदोस्त करून टाकण्याची इच्छा होणे, वडिलांना अरे-तुरे करून त्यांच्याशी भांडणे, त्यांचा खून करण्याची इच्छा होणे, वगैरे भाव.... खूप जोरात किंचाळण्याची इच्छा होणे किंवा कुठेतरी एकसारखे वायूवेगाने पळत सुटावे असे वाटणे.
महाविद्यालयीन काळात केलेल्या पराक्रमातून हाती आलेल्या कर्जाची परतफेड करतपर्यंत नायकाला चैन नसतो. शेट चे २०० रूपयाची उधारी फेडत पर्यंत वार लावून जगण्याचा आणि कुठलेही फाजील खर्च न करता जगण्याचा अनैसर्गिक प्रयत्न....त्यातल्या त्यात अती जवळच्या मित्रांवरचा राग.. अगदी स्वाभाविकपणे घडत असलेल्या एखाद्या स्वतंत्र वृत्तीच्या मनाचे प्रत्येक कंगोरे इतके सहज पणे रेखाटने म्हणजे दिव्यताच..!
सर्वात महत्वाचं म्हणजे नेमाडे ह्यांची लेखन शैलीची अजबगजब ओळख.....ती, 'उदाहरणार्थ', 'वगैरे', 'हे एक थोरच', 'हे एक भलतंच' ह्या शब्दांनी किंवा उद्गारांनी संपुर्ण कादंबरी पकडून ठेवली आहे. जे अजरामर आहे. भलेही टिकाकारांनी ह्याच त्यांच्या लेखन शैलीच्या वेगळेपणावर 'भंपकपणाचा' शिक्कामोर्तब केला असला तरीही मला त्यात भंपक किंवा निरर्थक असं काहीही वाटलं नाही. उलट प्रत्येक लेखकाची शैली असते आणि लेखणाचं वेगळंपण इतिहासात कायम कोरून ठेवणारं ठरू शकते. किंबहूना ते ठरले आहे.
तसे सिंहगडावर केलेली पायपीट, वेताळ टेकडीवर सुरेशबरोबर दिव्याचे रहस्य शोधण्यासाठी केलेले धाडस, मेस सांभाळण्यात नायकाला आलेले अनुभव, गावातल्या गरीब लोकांची मानसिकता.. असे बरेचसे भाग बऱ्यापैकी अंगावर येतात. या व अशा अजून काही भागांमध्ये नायकाच्या हृदयाची तगमग भाषेचे कुठलेही अलंकार न वापरता अंगावर शहारा आणनारे आहे. हे दिव्यच..!
कोसला म्हणजे अगदी स्वच्छपणे मुक्त, उनाड, पक्षांसवे हुंदडणारं सांगवीकराचं जीवन मनाला हवंहवसं वाटून जाणारी अद्भूत लेखनकृती आहे.. त्यात आपण स्वत:ला ठेऊन जगतो.. एका अपयशी विद्यार्थ्याचे अगदी मनापासून आलेले हे प्रामाणिक आणि वास्तवदर्शी अनुभवकथन असे वर्णन लेखक "कोसला"चे करतात. नायकाच्या प्रश्नांना वाचक आपले प्रश्न समजतात. "कोसला"च्या जन्माची ही कहाणी सुरस आणि खूपच हृदयस्पर्शी आहे. एकंदरीत "कोसला"ने भारावून गेलो. अर्थात त्यातल्या अनेक असे विचारप्रवाह आहेत जे सामान्यपणे मान्य करणे म्हणजे चूकीचे ठरू शकते.. ते असे की, नायकाचे सिगरेट पिणे, खूप शिव्या देणे, वगैरे वगैरे... नायकाची म्हणजेच पांडूरंग सांगवीकराची मैत्री ही दाट कुणाशीच नसणे हेही नवलच..! परंतू जरी काही गोष्टी मनाला पटत नसेल आणि त्याही पेक्षा लेखकाच्या लिखाणाचे सौंदर्याची स्तुती न करता आपण आपल्या तत्वबुध्दीचा वापर करून त्यावर भाष्य करणे चूकीचे वाटते. नंतर हवे ते परिक्षण करायला हरकत नाही. नाहीतर नेमकं लेखकाला काय मांडायचंय आहे ह्या आशयाला व त्या कलाकृतीला आपण अनुभवू शकणार नाही. एवढेच....!!!!
No comments:
Post a Comment