Saturday, 20 June 2020

साहित्यातला किमयागार : विल्यम शेक्सपिअर



      एखाद्या लेखकाने माणसाच्या भावछटा रंगवण्यामध्ये जागतिक विक्रम करावा एवढं दिव्यलेखन करणाऱ्याला किमयागारच म्हणावं लागेल. असा किमयागार म्हणजे विल्यम शेक्सपिअर ज्यानं माणसाच्या एवढ्या भावछटा टिपल्या आणि रंगवल्या की तेवढ्या जगाच्या इतिहासात कोणीच रंगवल्या नसतील. सुप्रसिध्द लेखक 'अँथनी बर्जेस' म्हणतो की, "आपण जेंव्हा शेक्सपिअर वाचतो, तेंव्हा खरं तर ते एखाद्या आरशासमोर उभं राहण्यासारखं असतं. आपण शेक्सपिअरला वाचत नसतो, तर शेक्सपिअरच उलट आपल्याला वाचत असतो." ह्या साहित्यातल्या किमयागाराने आपल्या साहित्यात हास्य, शोक, शृंगार, बीभत्स, रौद्र, भीती वगैरे सगळेच रस आणि त्यात मानवी भावना़ंचं वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चित्रण केलंय. जसे ' ऑथेल्लो' आणि 'दी विटर्स टेल' मध्ये दिसणारा संशय आणि मत्सर. 'मॅक्बेथ' मधली टोकाची महत्वाकांक्षा, 'लियर' मधला हट्टीपणा, 'हॅम्लेट' मधला अविचार, सुड आणि अतिविचार (द्विधा मनस्थिती), 'अँटनी' मधली काममोहिनी या भावना शेक्सपिअरनं लिलया हाताळल्या आहेत. असे असुन सुध्दा लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यापर्यंत त्यांच्या स्वभावातली जी इनसाईट मांडणी केलीय ती कमालीची आहे. हे करत असतांना त्यानं शेकडो स्वभावरेषा अजरामर केल्या. हॅम्लेट, लियर, ऑथेल्लो यांच्यासारखे नायक, शॉयलॉक, एडमंड, इयॅगो यांच्यासारखे खलनायक, पोर्शिया, क्लिओपात्रा, क्रेसिडा, इझेबिला यांच्यासारख्या नायिका आणि फॉल्स्टाफ, मॅलव्होकीयो यांच्यासारखी विनोदी पात्रं अतिशय ताकदिनं मांडलीय. यांच्या विषयी अजूनही विश्लेषणं आणि वादविवाद चर्चा सुरूच आहेत जसे फाॅल्स्टाफ हा शुर होता की भित्रा..? इत्यादी. 
       विल्यम शेक्सपिअरच्या ह्या अद्वितीय लेखन सामर्थ्यावर अनेक टिकाकारांनी, चाहत्यांनी आपल्या लेखनी खर्ची घातल्या आहेतच. त्यामध्ये काही सकारात्मक तर काही नकारात्मक कंगोरेही आहेत. त्याचाच समकालीन मित्र, प्रतिस्पर्धी बेन जॉन्सनने म्हटले आहे की, "शेक्सपिअर हा युगाचा किंवा काळाचा नव्हता तर तो अनंत काळ टिकणारा होता" तर टॉलस्टॉयने "शेक्सपिअरच्या लिखाणात वाईट गोष्टीचं चित्रण आहे, अनैतिकता आहे. अधार्मिकता आहे आणि त्याची भाषा कुत्रीम आहे. तेंव्हा लोकांनी शेक्सपिअरच्या वेडगळ स्तुतीतून, पुजणातून लोकांनी लवकर बाहेर यावे, त्याची सर्व नाटकं विसरून जावे" अशी टिका केली असली तरी आतापर्यंत चारशे चार वर्षे झाली तरी त्याच्या नाटकांची मोहिनी उतरली नाही.

     विल्यम शेक्सपीअरच्या जन्माची आणि मृत्यूची तारीख २३ एप्रिल हेही कमालच..!  ह्या अजरामर सुनीतं लिहणाऱ्या साहित्यिकाचं स्मरण हेतू 'जागतिक काव्य दिन'  जगात साजरा केल्या जातो.  विल्यमचा मृत्यू १६१६ मध्ये झाला आज चारशेचार वर्षे होत आहेत. शेक्सपिअर केवळ ५२ वर्षे जगला. मात्र, तो मरण पावल्यानंतर इंग्लंडला त्याची महती कळली होती. यश, कीर्ती आणि पैसा सारे त्याच्याकडे धावत होते. मृत्यूनंतर गेल्या चार शतकांत शेक्सपिअर पोहोचला नाही, असा जगाच्या पाठीवर एकही भूभाग नसेल जिथे त्याची नाटके, सुनीते किंवा अशी एकही आधुनिक भाषा नसेल की ज्यात दीर्घ कवितांचा अनुवाद झाला नाही, कळत नकळत शेक्सपिअर सर्व सुसंस्कृत विश्वाला व्यापून उरला आहे. गेल्या चारशे वर्षातलं कुठलंही नाटक, सिनेमा किंवा कथा कादंबऱ्या बघितल्या तर त्यात कुठे ना कुठे तरी दुरून का होईना शेक्सपिअर डोकावतांना दिसेलच. एवढ्यात मराठीत आलेला ‘नटसम्राट’ हा चित्रपट मूळ ज्या नाटकावरून आला ते वि. वा. शिरवाडकर यांचे नाटक हे शेक्सपिअरला प्रभावित होऊनच लिहिलेले होते. विशाल भारद्वाज यांनी शेक्सपिअरच्या नाटकांच्या कथा मनात ठेवून 'मकबूल', 'ओंकारा'.. असे अनेक चित्रपट काढले. गुलजार यांनी दिग्दर्शन केलेला ‘अंगुर’ हा हिंदी सिनेमा ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या कादंबरीवरून आला असला तरी मुळात ती कादंबरी शेक्सपिअरच्या ‘द कॉमेडी ऑफ एरर्स’ या नाटकावरून घेतली होती. मराठीतले पहिले आधुनिक मानले जाणारे ‘सवाई माधवरावाचा खून’ हेही नाटक शेक्सपिअरच्या प्रभावातून जन्मले. हे असे जगातल्या प्रत्येक आधुनिक भाषेत झाले आणि होत आहे. लिहिणाऱ्या, वाचणाऱ्या किंवा नाटक-सिनेमे पाहणाऱ्या रसिकांना इतका दीर्घकाळ गुंतवून ठेवणारा दुसरा लेखक पृथ्वीच्या पाठीवर आजवर कुणी झाला नसेल. ह्याचं सुंदर उदाहरणुत्तर विंदा करंदीकर यांनी ‘तुकोबाच्या भेटी शेक्सपिअर आला..’ या कवितेत दिले आहे. ते म्हणतात, ‘तुका म्हणे, ‘विल्या, तुझे कर्म थोर। अवघाचि संसार। उभा केला।’ हा ‘अवघाचि संसार’ मानवी भावभावनांचे तळ शोधणारा होता. विश्वासाने खांद्यावर मान टाकलेला मित्र आपल्या खुनाच्या कटात दिसतो, तेव्हा ज्यूलियस सीझरने काढलेले ‘ब्रूटस, यू टू?’ हे उद्गार गेली चार शतके विश्वासघाताच्या विश्वाचे रूप दाखवत आहेत. ३७ नाटके आणि १५४ सॉनेट्समधून आणि मराठी सुनीत यातूनही आले. शेक्सपीअरने जे विश्वदर्शन घडविले त्यात नात्यांचे पोत आणि पीळ होते. नियतीचे फटकेही होते. ‘हॅम्लेट’ नाटकात हॅम्लेट ‘दॅट वन मे स्माइल अँड स्माइल अँड बी अ व्हिलन..’ असे म्हणतो. दुटप्पीपणाचा बुरखा फाडणारे हे छोटेसे वाक्य रोजच्या रोज सारे जग अनुभवते आहे. शेक्सपिअरच्या मोहिनीचे गूज उलगडण्याचा प्रयत्न हजारो अभ्यासकांनी केला. आजही चालू आहे. त्यांत मानसशास्त्रज्ञ ते संस्कृतीचे अभ्यासक व भाषाशास्त्रज्ञ ते राज्यशास्त्रज्ञ असे सारेच आहेत. इंग्रजांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता, म्हणून शेक्सपिअर कायम उजेडात राहिला, अशी टीकाही होते. शेक्सपिअर हे नावही माहीत नसताना त्याची विविध मार्गांनी पोहोचलेली कलाकृती रसिक जेव्हा डोक्यावर घेतात. ह्यातच त्या लेखकाच्या लेखणीचं दिव्य लक्षात येतं.. विविध भाषांमधील लेखकांनी कितीही लेखन केले असले तरी अनेक शतकांपर्यंत शेक्सपिअर हा लिहणाऱ्यांच्या भावछटांतून जीवंत राहिल ह्यात शंका नाही...साहित्य क्षेत्रातल्या ह्या अजरामर कलाकृतीला सलाम..!

■ लेखक : किशोर तळोकार ९६७३०६०७६२
===============================
》संदर्भ : 
▪ झपूर्झा - अच्युत गोडबोले
▪ वृत्तपत्रे टिकात्मक परिक्षणात्मक लेख - लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स
▪ विल्यम शेक्सपिअरचा मराठी लिट्रेचर मधील नाटकांचा काही भाग

No comments: