■ शिवाजींचा छावा | धर्मवीर संभाजी
"श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरीव राजते, यंदकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरी" शिवपुत्र श्री शंभु राजे यांची राजमुद्रा सूर्याच्या तेजाप्रमाणे आकाशी शोभते आहे लोकांच्या कल्याणाकरिता तिचा अंमल सर्वत्र गाजणारा आहे त्यासाठी ही मुद्रा सदैव प्रकाशमान आहे !
मराठी बाणा काळजात आणि प्रत्येक मराठी माणसाच्या नसानसात भिणवणारा छत्रपती शिवाजींचा छावा, धर्मवीर, स्वराज्यरक्षणकर्ते, संस्कृत भाषेचे पंडित आणि अशी अनेक नामाबिरुदे मिरवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांचा ११ मार्च हा बलिदानदिन आहे. अनन्वित अत्याचार सहन करूनही धर्मांतर करण्यास स्पष्टपणे नकार देणारे धर्माभिमानी असणारे संभाजी महाराज एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा करून शिवाजी महाराजांनंतर सलग ९ वर्ष संभाजी महाराजांनी स्वराज्य टिकवले. मुघल, आदिलशहा, सिद्दी, पोर्तुगीज आणि अंतर्गत शत्रूंचा छडा लावत त्यांना चांगलेज झुंजवले. राजकारण, मुसद्देगिरी, समाजकारण, धर्मकारण यांच्यात मुरलेले संभाजी राजे रणांगणावरचे शेर होते. स्वकीयांनी फितुरी केली नसती, तर संभाजी राजे केव्हाच कुणाच्या हाती लागले नसते. वादळाप्रमाणे शत्रूवर चाल करून जायची, त्यांची पद्धत अजब होती.
छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे सुपुत्र असल्याने रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजी राजे अभ्यासात अत्यंत हुशार होते. अनेक भाषा त्यांनी आत्मसात केल्या होत्या. संस्कृत भाषेवर विशेष प्रभूत्व मिळवले होते. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला. याशिवाय नाईकाभेद, नखशिखा, सातसतक या ग्रथांची निर्मिती केली. संभाजी महाराजांचे सल्लागार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवी कलश यांच्याशी राजेंची मैत्री ही साहित्यामुळे अधिक घट्ट झाली, असे सांगण्यात येते. एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन इतिहास घडविणारे आणि इतिहास लिहिणारे संभाजी महाराज होते.
छत्रपती संभाजी महाराज हे राज्यकारभारातही अत्यंत निपूण होते. कुशल संघटक होते. शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांनीही अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली होती. यामध्ये पंतप्रधान म्हणून निळोपंत पिंगळे, चिटणीस म्हणून बाळाजी आवजी, सेनापती म्हणून हंबीरराव मोहिते, न्यायाधीश म्हणून प्रल्हाद निराजी, डबीर म्हणून जनार्दन पंत, पंडितराव दानाध्यक्ष म्हणून मोरेश्वर पंडितराव, सुरनीस म्हणून आबाजी सोनदेव, वाकेनविस म्हणून दत्ताजी पंत, मुजुमदार अण्णाजी दत्तो यांना नेमले होते.
संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठीही भरपूर कामे केली. एवढेच नव्हे तर संभाजी महाराजांच्या धार्मिक धोरणांवरही छत्रपती शिवाजी महाराज यांचा ठसा कोरलेला आढळतो. समर्थ रामदास स्वामींना मिळालेल्या राममूर्तीची चाफळ येथे स्थापना करून मंदिर उभारले. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा गोसावी, मोरया गोसावी, समर्थ रामदास, सदानंद गोसावी यांना शिवाजी महाराजांनंतरही सर्वतोपरी मदत केली. यासह अनेकांना त्यांनी सढळ हस्ते मदत केल्याचे अनेक दाखले आपल्याला देता येतील. छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या काही दानपत्रावरून त्यांच्या संस्कृत ज्ञानाविषयी माहिती मिळते. संभाजी राजेंनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. तीन भागांतील बुधभूषण या ग्रंथात काव्यालंकार, शास्त्रे, संगीत, पुराणे, धनुर्विविद्या यांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे. तसेच राजा आणि त्याचे गुण, राजाचे मदतनीस, राजाचे सल्लागार, राजाची कर्तव्ये, राजसभा, मुख्य प्रधान राजपुत्र, त्यांचे शिक्षण, त्यांची कर्तव्ये, कोश, दुर्ग, सैन्य, हेर, नोकर, वगैरेंची माहिती दिली आहे. याशिवाय गागाभट्टांकडून नीतिपर 'समयनय' हा ग्रंथ संभाजी राजेंनी लिहून घेतला. 'धर्म कल्पलता' हा धर्मशास्त्रावरील गंथ केशव पंडिताने संभाजीराजांसाठी लिहिला. युद्धकलेतील नैपुण्याबद्दल ॲबे कॅरे या परकीय लेखकाने संभाजी महाराजांची प्रशंसा केली आहे. यावरून संभाजी महाराजांच्या अफाट बुद्धी, ज्ञान, अनेक भाषांवरील प्रभुत्व, धर्माभिमान याचा अंदाज लावता येऊ शकतो.
छत्रपती शिवाजी महाजांनंतर संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली. स्वराज्य विस्तारण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले. गनिमी काव्याचा चपखलपणे वापर करत शत्रूंना झुंजवले. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे १२० युद्धे केली. मात्र, एकाही लढाईत ते कधीही पराभूत झाले नाहीत. संभाजी राजेंची शत्रूवर चाल करून जायची पद्धत वादळी होती. संभाजी राजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. शत्रूला ते कधीही सापडले नाहीत. मात्र, स्वकीयांनी टाकलेल्या फितुरीच्या जाळ्यात संभाजी महाराज अडकले आणि कैद झाले. १६८९ च्या सुरवातीला छत्रपती संभाजी राजेंचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. मराठ्यांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. परिणामी शत्रूने संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात मोघलांना यश आले. संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड येथे नेले. संभाजीराजांनी धर्मांतर केल्यास जीवदान देण्याची अट औरंगजेबाने घातली होती. मात्र, संभाजी राजेंनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाचे अनन्वित अत्याचार असह्य होऊन सुमारे ४० दिवसांनी फाल्गुन अमावास्या म्हणजेच ११ मार्च १६८९ रोजी संभाजी महाराजांची प्राणज्योत अखेर मालवली. असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर हे पदवी बहाल केली.
■ लेखक : किशोर तळोकार | ९६७३०६०७६२
■ संदर्भ : छावा - शिवाजी सावंत, मृत्युंजय - नाटक, धर्मवीर संभाजी - ग.कृ. गोडसे (नाटक), विकीपिडीया साभार
No comments:
Post a Comment