Friday, 4 December 2015

"जागतिक तापमानवाढ व वाढते प्रदुषण"- एक चिंतन..!

"जागतिक तापमानवाढ व वाढते प्रदुषण"- एक चिंतन..!
                                         -किशोर तळोकार

......सध्याचा चर्चेत असलेला केजरीवाल सरकारचा निर्णय "एक दिन कार, एकदिन बेकार" व्यावहारीक की अव्यावहारीक हा वाद सुरु आहे. मुळात घेतलेला निर्णय हा वातावरणाला कितपत पोषक ठरेल किंवा नाही हाही महत्वाचा मुद्दा आहे. दिल्लीतील लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या नंतर लक्षात येतेय की, प्रत्येकजण हा आपल्या सोईचा विचार करतांना दिसुन येते आहे. परंतु दिवसेंदिवस वाहनांमुळे वाढत्या  प्रदुषणाचा मुद्दाही तितकाच महत्वाचा आहे. ईव्हन आणि आॅड नंबर ह्या मुळे काय फायदा होईल व सर्वसामान्य जनजीवन त्याचा कसा स्विकार करतं त्यावर सर्व काही ठरेल. परंतु सोबतच ज्या ठिकाणी ज्यांना विनाकार रहावे लागेल. अर्थात वैयक्तीक वाहना शिवायचा प्रवास करावा लागेल. तेव्हा  त्यावेळी दिल्लीतील वाहतुक व्यवस्था सशक्त करणे गरजेचे ठरेल. परंतु ईतकं करूनही नागरिकांनी प्रथम माणसिकता बदलायला हवी.! आपली लाईफ स्टाईल जगतांना पर्यावरण सुसंगत विचार व्हायला हवा.
     कारण प्रदुषण हा अती गंभीर विषय आहे. त्याविषयी आपणास समजुन घ्यावे लागेल. 'वायुप्रदूषण म्हणजे वातावरणाचे प्रदूषण. मानवी आरोग्यास तसेच पर्यावरणाचा हिस्सा असलेले प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू इत्यादींना हानिकारक असलेले घटक जेव्हा हवेमध्ये मिसळून जातात तेव्हा वायुप्रदूषण झाल्याचे समजण्यात येते. जे मानवी आरोग्यास हानिकारक आहेत, तेच वातावरणातील घटक वायुप्रदूषणास जवाबदार आहेत, असे पूर्वी समजले जात होते. कालांतराने वायुप्रदूषणाची व्याख्या इतर प्राण्यांना, पक्ष्यांना व वनस्पतींना हानिकारक असलेल्या घटकांनाही लागू झाली. सध्याच्या युगात हवामान बदलास जवाबदार असणारे घटक हे देखील वायुप्रदूषणाला कारणीभूत असल्याचे मानले जाते. हवामान बदलास जवाबदार घटक म्हणजे कार्बन डायॉक्साईड. ह्या प्रदूषक घटकांचे वातावरणातील वाढलेल्या प्रमाणाला बहुतांशी मानव जबाबदार आहे. या घटकांचा प्रभाव मानवी आरोग्यावर पटकन दिसून येतो. मात्र निसर्गातील काही घटक या प्रदूषक घटकांचे प्रमाण कमी करण्यात सातत्याने मदत करत असतात. प्रदुषणरहीत सर्व घटकांचा वातावरणात टिकून रहाण्याची क्षमता काही मिनिटांपासून ते सहा महिन्यांपर्यंत असते. याचा अर्थ प्रदूषण रोखण्यासाठी उपाय योजना योजल्यास त्याचे परिणाम काही महिन्यातच दिसून येतात. परंतु काही घटक हे वातावरणात कित्येक वर्षे, दशके, किंबहुना शतके टिकून रहातात व हेच घटक मुख्यत्वे हवामान बदलास जबाबदार आहेत. हवामान बदलामध्ये जागतिक तापमानवाढ ही सर्वात चिंताजनक बाब आहे. आणि तो सध्याचा सर्वात चर्चिला जाणारा विषय आहे. वाहनांतुन निघणारा कार्बन डायॉक्साईडच्या उत्सर्जनामुळे होणारा तो परिणाम आहे. साधारणपणे १९९० पर्यंत कार्बन डायॉक्साईड हा प्रदूषक घटकांमध्ये मानला जात नव्हता कारण कोणत्याही ज्वलनाचा अंतिम पदार्थ कार्बन डायॉक्साईडच असतो. तसेच आरोग्यावर याचे परिणाम गंभीर मानले जात नव्हते. तापमानवाढीचा व कार्बन डायॉक्साईडच्या वाढत्या प्रमाणाचा जवळचा संबंध आहे. हे शिक्कामोर्तब झाल्यानंतर कार्बन डायॉक्साईड हा महत्त्वाचा प्रदूषक घटक आहे याला मान्यता मिळाली.
कार्बन डायॉक्साईडचे वातावरणातील प्रमाण ०.३ टक्के इतके अपेक्षित आहे. निसर्गातील अनेक प्रकियांमध्ये (जीवसृष्टीतील श्वासोछ्वास) कार्बन डायॉक्साईड उत्सर्जित होत असतो. परंतु निसर्गाने वनस्पतींना प्रकाश संश्लेषणातून कार्बन डायॉक्साईडला पुन्हा कार्बन व ऑक्सिजन वेगळे करण्याची क्षमता प्रदान केली आहे. औद्योगिक क्रांतीनंतर मानवाने मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचा वापर करण्यास सुरुवात केली व त्याच वेळेस मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीने पृथ्वीवरील वनस्पतींची कार्बन डायॉक्साईडला ऑक्सिजनमध्ये परिवर्तन करण्याची क्षमता कमी झाली. परिणामी वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढले व वाढत आहे. सध्याचे वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण ०.३८५ टक्के इतके आहे.
सध्याचा अतीवापरातला मानवनिर्मित स्रोत म्हणजे वाहने - नायट्रोजन ऑक्साईड व डायॉक्साईड, व्हीओसी, कार्बन मोनॉक्साईड व डायॉक्साईड, सूक्ष्म व अतिसूक्ष्म धूलिकण. ह्या सर्व प्रदुषणाचा होणारा  आरोग्यावरील परिणाम अतिशय घातक आहे. वायुप्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम श्वसनसंस्थेवर होतो. वर नमूद केल्याप्रमाणे विविध प्रदूषक घटके श्वसनव्यस्थेवर हल्ला चढवतात. ओझोन, नायट्रोजन डायॉक्साईड हे फुफ्फुसांवर अतिशय घातक परिणाम करतात. ओझोन फुफ्फुसांमधील पेशींना नष्ट करून फुफ्फुसे कमजोर करतो, त्यामुळे दमा वाढीस लागतो. नायट्रोजन ऑक्साईड हे श्वसन नलिकेत व फुफ्फुसांत गेल्यानंतर फुफ्फुसे व श्वसन नलिका ते विरघळवण्यासाठी जास्तीजास्त कफाची निर्मिती करतात व त्यामुळे आपणास सर्दी होते. ही सर्दी अनेक दिवसांची जुनी झाल्यास जीवाणूंचा संसर्ग होतो व परिस्थिती गंभीर होते. कार्बन मोनॉक्साईड आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन वाहण्याचे काम करणारे हिमोग्लोबिनमध्ये ऑक्सिजनऐवजी मिसळून जातो व शरीरातील सर्व भागात पोहोचतो. हा वायू अत्यंत विषारी असून काही मिनिटे सातत्याने संपर्कात आल्यास मृत्यूही ओढवू शकतो.
     निसर्गातील इतर घटकांवर परिणाम केवळ मनुष्यच नव्हे तर निसर्गातील इतर घटकांवर प्रदूषणाचे विपरीत परिणाम होतात. दिल्ली मध्ये इन्व्हर्जनमुळे साठणारे धुके, या धुक्यांमुळे प्रदूषण पातळी मोठ्या प्रमाणावर वाढते. वायुप्रदूषण कमी जास्त होण्यात हवामानाचा खूपच प्रभाव असतो. जमिनीवरील तापमान, हवेतील तापमान, वातावरणातील वरच्या भागातील तापमान इत्यादी प्रदूषण पसरवण्यात किंवा एकवटण्यात महत्त्वाची कामगिरी बजावतात. वार्‍याचा वेग व दिशा हे त्यांत महत्त्वाचे घटक ठरतात.
     प्रत्येकांनी प्रदुषण हा आपल्या पुढे असणारा ज्वलंत विषय समोर असतांना आपण आपल्या सोईचा जास्त विचार करतो. खरोखर चिंतनीय आहे. दिल्लीतीलच नव्हे तर गल्तीतील प्रत्येकांनी ह्यावर चिंतन करणे काळाजी गरज आहे.

किशोर तळोकार
9673060762
जिल्हाध्यक्ष
शिक्षक साहित्य संघ यवतमाळ

No comments: