Thursday, 5 February 2015

अनुभवातुन शिक्षण ही काळाची गरज

"अनुभवातुन शिक्षण हि काळाची गरज"-

.....सकाळचे नऊ वाजले अन लगबगीने शाळेत जायची तयारी करायला  लागलो. घड्याळाचा काटा सारखा परिक्षा घेतल्यागत धावत होता. सकाळी उठायला उशीर झाल्यामुळे आज तयारी जरा घाईघाईत झाली. तयारी झाली अन थेट शाळेचा रस्ता गाठला. वाट पार करतांना मुलांचे किलबिलणारे चेहरे डोळ्या समोर नाचत होते. आणि एकाकएक भन्नाट कल्पना मनात गोंगाट करत होत्या. रोज काहीतरी मुलांना देता येईल का? ह्या विचाराने मनात नेहमीच गोंधळ सुरू असतो. तरी डोक्यात विचाराची गर्दी संपता संपत नव्हती.... तोच शाळेचं प्रवेश द्वार पुढ्यात उभं ठाकलं...! अन मुलांचा नेहमीचा आरडा ओरडा सुरू झाला. " सर आले ... सर आले..!"
      त्यांच्या ह्या आल्या आल्या धिंगाणा घालणार्‍या सवयीने रोज आमचे होणारे स्वागत बघुन आनंद वाटत होता. आपलं मनही त्यांच्यासारखं उड्या मारायला लागतं. ह्या उत्साहाने होणारी शाळेची सुरुवात पाहली की, हा आनंद-उत्साह आणखी कसा द्विगुणीत करता येईल असं हळुच मनात उमटुन जातं.
मुले पटापट स्वत:च शाळेचा परिसर स्वच्छ करायला लागली. व त्यांनी परिपाठाची तयारी करुन छान  परिपाठ सादर केला. अल्प विरामा नंतर लगेच सगळे मुले आणि मी वर्गात आलोत. खुर्ची वर बसलो तोच समोर पाठ टाचणाची वही एका बाजुला रुसुन बसलेली नजरेत पडली. अन कपाळावर आठ्या आल्या. कारण काल मी ती शाळेतच विसरून गेलो होतो. त्यामुळे आजचं टाचण लिहलं नव्हतं म्हणुन जरा चुकचकल्या सारखं वाटत होतं. नेहमीची सवय ना..! म्हणुन. बाकी काही नाही.
       खरं म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक ह्यांच्यातील दिवस भराचा संवाद व घडुन येणारी आंतरक्रिया अशी कागदावर आधीच रेखाटुन काम केल्याचं देणारं प्रमाण मला फारसं रुचत नाही. तरीपण एक नियोजनाचा भाग व आपले कार्यालयीन काम म्हणुन करायचं आहे, एवढचं ठरवलेलं असतं.
       विद्यार्थ्यामध्ये त्यांच्या अपेक्षित क्षमतांचा विकास करायचा असेल तर प्रथम त्यांच्या आवडीनिवडीचा, जाणिवेचा, संस्काराचा आणि  त्याच्या परिस्थितीचा सांगोपांग विचार करुनच पाठ्यक्रमाची व अभ्यासक्रमाची रचना व्हायला हवी  असे वाटते. कारण कधी कधी पाठ्यक्रमातील काही गोष्टी काही संबोध समजताना त्यांना तेथील पोषक परिस्थिती असेलच असे नाही. परंतु असा काही विचार प्रत्येक्षात होतांना दिसत नाही तेंव्हा चिंता वाटते. त्यातच अभ्यासक्रम व पाठ्यक्रम हा अपुर्ण राहायला नको ह्यासाठी सर्वांची धडपड सुरु असते. माञ अभ्यासक्रम पुर्ण करत असतांना विद्यार्थ्यांना सदर इयत्तेच्या अपेक्षित क्षमता व उद्दिष्टे मिळेलच ह्याची शास्वती देता येत नाही. शिक्षकांना प्रत्येक तासिकेला पुर्णवेळ खरचं मिळतो का हाही आज चर्चेचा विषय आहे. कारण सध्याच्या काळात शैक्षणिक व अशैक्षणिक लेखी कामाचा बोझा हा अतोनात आहे. सर्वांगिण विकासाच्या  दृष्टीकोनातून विचार केल्यास शिक्षकांना अध्यापणासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा असे वाटते.
आजही ग्रामिण भागात एका शिक्षकामागे दोन/तीन/चार/पाच वर्ग असतात. मग कसे काय सर्व  तासिकांना न्याय देता येईल. शक्यच नाही..! ही बाब शासनाने लक्षात घ्यायला हवी.
       माझ्या मते अभ्यासक्रम हा व्यक्तीमत्वाचा जडण घडणे मध्ये एक मार्गदर्शक  स्वरुपाचा असायला हवा. प्रारंभिक शिक्षण हे वाचन लेखन ह्या तत्वावर तयार करावे. व पर्यायी विषय हे  अनुभवावर आधारित प्रात्यक्षिकाद्वारे स्पष्ट करुन द्यायला हवे. जसे भुगोल, विज्ञान आणि इतिहासाच्या लेखी कामाचा अती आग्रह नकोच..! विज्ञान व भुगोलाचे धडे हे पण एक सुंदर प्रायोगिक पध्दतीने वा कृतीयुक्त शैक्षणिक साहित्यातुन, माॅडेल्स मधुनही देता येईल. इतिहास हा कथाकथनाच्या माध्यमातुन, चिञपटातुन रुजवला जाऊ शकेल असे वाटते. इतर कला, कार्यानुभव, शारिरीक  शिक्षण हे प्रात्यक्षिकाद्वारे देतो आहोतच की.! सर्व  विषयाचे दिवसागणिक एकसुञ पध्दतीने नियोजन करता येईल. कुठलाही विषय रुजवतांना विद्यार्थ्यांचे समाजातील प्रत्येक घटकाशी त्याच्या कृतीचे आदान प्रदान व्हायला हवे. शाळेची मर्यादा शिक्षक-शाळेची इमारत-शालेय परिसर एवढीच पुरेशी नाही तर ती सर्वञ असावी. शिक्षणाच्या वाटा अनेक आहेत फक्त त्या शोधाव्या लागतील. अशाच शिक्षण प्रक्रियेतुन मुलांना परिक्षार्थी वृत्तीतुन काढुन माणुस म्हणुन घडण्याच्या प्रक्रियेमध्ये आणता येईल.
ज्ञानरचना वादाचे खरे फलीत करतांना "अनुभवातुन शिक्षण" ह्या प्रक्रियेची गरज आहे.
        शिक्षणाने एक सुजाण व समजदार माणुस घडला तरच शिक्षणाचे यश  समजावे व त्यालाच सुशिक्षित हा शब्दही शोभेल असे वाटते.
      आज शिक्षणातुन माणुस हा यंञाचा गुलाम झालेला दिसतो आहे. वस्तुसंचयाच्या आकसापोटी नातेसंबंध, समाज बांधिलकी ह्या पासुन दुर गेलेला दिसत आहे. विकासाच्या नावाखाली पुर्णत: भरकटलेला एक भयंकर विध्वंसी माणुस झालेला दिसतो आहे. हे सर्व  आपल्याला दै. वृत्तपञातुन रोजच्या बातम्या वाचल्या की  लक्षात येईलच.  मानवाची वैचारिक पातळी खालावत चाललेली आहे. नुसतं स्वार्थापोटी सर्वजण एकमेकाच्या भावणांचे शोषण करत असतात. आता माणसाच्याच पोषणाचा प्रश्न उभा राहणार आहे. कित्येकाचे निष्पाप बळी जात आहे. परंतू  तरिही आज समाजाचे डोळे उघडलेले नाही. त्यावर स्वार्थाची झापड आलेली दिसते. हे सर्व  आतापर्यंतच्या शिक्षणप्रक्रीचेच अपयश असावे असे वाटुन जाते.
       म्हणुन आज शिक्षणावर व त्याच्या प्रणालीवर पुन्हा विचार व्हायला हवा. कंञाटीचे व कमिशनचे राजकारण करण्यापेक्षा सशक्त व्यवस्थापण कसे करता येईल ह्याचा विचार व्हायला पाहिजे. उपेक्षितांचे संसाधन करुन समाज विकासासाठी पोषक वातावरण तयार व्हायला हवे. शिक्षणासाठी पुरेसे मनुष्यबळ वाढवुन विद्यार्थ्यांसाठी झटणार्या लोकांना ह्या प्रवाहात आणायला पाहिजे. अशैक्षणिक कामासाठी स्वतंञ यंञणा राबवायला हवी. मग भलेही प्रत्येक वर्गाचे, शाळेचे कितीही मुल्यमापण होवोत. शिक्षकांनी समर्थ रहावे. पुरस्कारासाठी प्रस्ताव मांगण्यापेक्षा प्रत्यक्ष काम व विद्यार्थ्याचा विकासालेख तपासुनच त्या त्या लोकांना प्रोत्साहन व पुरस्कार द्यायला हवीत. "विद्यार्थीधिष्टीत असेे स्वतंञ कृतीयुक्त अनुभवपुर्ण" कार्यक्रमातुन शिक्षण मिळावे व शिक्षकांना पुरेसा वेळ देउन अध्यापणाचे पुर्ण स्वातंञ्य द्यावे असे अपेक्षित आहे .
👉लेखक- किशोर तळोकार
📱9673060762
(दि.4/2/15 वेळ.10.30pm)

No comments: