Thursday, 3 March 2016

निसर्गाच्या अद्धभूत सौंदर्यांने नटलेली सालबर्डी याञा शिवभक्तांचे श्रध्दास्थान


निसर्गाच्या अद्धभूत सौंदर्यांने नटलेली सालबर्डी याञा शिवभक्तांचे श्रध्दास्थान  ("शिवराञी विषेश")ऐतिहासिक माहिती..!
          - लेखक- किशोर तळोकार
                        9673060762

प्रकाशित- दै. दिव्यमराठी (माझा विदर्भ, पान क्र.२) सोमवार दि.७ मार्च २०१६
   
     संपुर्ण भारतात अनेक प्रमुख सणापैकी महाशिवराञी हा शिवभक्तांचा सण महत्तम समजला जातो. अनेक महादेव भक्त हे व्रत दरवर्षी नित्यनियमाने करित असतात. महाशिवराञी हे एक काम्य व नैमित्यिक व्रत आहे. चतुर्दशी दोन दिवसात विभागलेली असेल व ज्या मध्यराञी चतुर्दशी येत असेल ती राञ "शिवराञ" मानली जाते. शिवराञीचा कालनिश्चय करतांना दिवसाला महत्व नसुन राञीला महत्व आहे. महाशिवराञी सर्व वर्णातील स्ञी पुरुषांना विहित आहे. तेथे कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो. ह्या व्रताचे वैशिष्टय म्हणजे उपवास, पुजा, जागरण ही या व्रताची तीन मुख्य अंगे असुन ती सारखीच महत्वाची आहे. "शिव" ही या व्रताची अग्रगण्य देवता आहे.
      मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सिमेवर सातपुड्याच्या पर्वत रांगेत आपल्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्याने परीपुर्ण अवस्थेत वसलेलं सालबर्डी एक छोटसं गाव..! येथील शिवलिंग मध्यप्रदेश शासनाच्या नियंञणात तर येथील दरवर्षी होत असलेली बहुचर्चित "सालबर्डी याञा" महाराष्ट्र शासनाच्या नियंञणात आहे. सालबर्डी हे गाव अमरावती जिल्ह्यातील मोर्शी ह्या शहरालगत १० किमी च्या अंतरावर आहे.  ही याञा दोन्ही राज्यातील शिवभक्तांना जोडणारी आहे. याच ठिकाणी महानुभावाचे दैवत श्री चक्रधर स्वामी यांनी धारण केलेले मौन व्रत व ८८ वर्षापुर्वी राष्ट्रसंतानी केलेला महायद्न्य या घटनांची सालबर्डी याञा साक्षीदार आहे. तसेच पांडवाच्या अज्ञातवासाला साक्षीदार असलेल्या ह्या ठिकाणाला सुमारे ७०० वर्षांची परंपरा आहे. जवळपास दहा दिवस चालणार्या ह्या याञेत विदर्भासह मध्य प्रदेशातील लाखो शिवभक्त प्रामुख्याने दरवर्षी आपली हजेरी लावत असतात. प्रतिदिन ७० हजार लोकं याञेत सहभागी होतात. मध्यप्रदेश शासनाच्या हद्दीत प्रभात पट्टन च्या जवळ असलेल्या ग्राम पंचायत पाबल च्या सीमा क्षेत्रात स्थित श्रीक्षेत्र झिरी मध्ये एका छोट्याश्या गुफेत शिवशंभू महादेव शिवलिंगाच्या रूपात विराजित आहे. सातपूड्याच्या नैसर्गीक कुशीत सुमारे ३८९ मीटर उंचीवर भल्या मोठ्या दगडातुन प्राचीन शिवलिंगावर अखंड पाण्याचा अभिषेक सुरू असतो. जणुकाही निसर्ग स्वतःच जलाभिषेक करतो आहे ह्याचा भास व्हायला लागतो. एकेदिवशी या ठिकाणाच्या शिवलिंगावर झिरपणारे पाणी अचानक बंद झाले होते. ही बाब काही शिवभक्तांना जेंव्हा लक्षात आली तेंव्हा एका भक्ताने या ठिकाणी आत जावुन बघितले असता पुन्हा विशाल पहाडातुन पाण्याचे झिरपणे सुरु झाल्याचे दिसले.
     देशातील बारा जोतिर्लिंग ज्याप्रमाणे प्रसिध्द आहेत. त्यापैकी सालबर्डीलाही छोटा महादेव म्हणुन स्थान आहे. ज्या शिवभक्तांना पंचमढीच्या मोठ्या महादेवाला जाणे शक्य होत नाही. ते सालबर्डी ला भेट देवुन आपली श्रद्धापुर्ती करतात. महादेवाचे दर्शन व येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. माडू नदीच्या काठावर थंड गरम पाण्याचे झरे असुन हे ठिकाण सितेची न्हानी म्हणुन प्रसिद्ध आहे. या पाण्याने चर्मरोग असणार्‍याने नियमित आंघोळ केल्यास चर्मरोग कायमचा नाहिसा होतो. असेही बोलले जाते. या शिवाय मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामाच्या अश्वमेघ यद्न्यातील शामवर्ण घोड्याच्या टाचांसमान खुणा आजही सालबर्डी च्या पर्वतरांगामध्ये ठिकठिकाणी आढळुन येतात. याच पर्वतरांगांमध्ये पुरातन अशी पांडव कचेरी असुन अद्न्यात वासात पांडवाचे याच ठिकाणी वास्तव होते. दगडी फरश्याद्वारे कोरीव काम केलेले मोठे सभागृह आहे. ती  पांडव कचेरी हेमांडपंथी मंदीराच्या आकाराची आहे. सभोवताल परकोट बांधला असुन सध्या भग्नावस्तेत आहे. पहिली पायरी चढल्यानंतर थोड्या अंतरावर माडू नदी व गंगानदीचा संगम असुन या दोन्ही नद्यांच्या काठावर पुर्वेस राम मंदीर तर पश्चिमेस चक्रधर स्वामीचे मोठे मंदीर आहे. चक्रधर स्वामींनी या ठिकाणी मौनव्रत धारण करून तपस्या केली होती. पंचकृष्णापैकी त्यांना पाचवे कृष्ण म्हणुन समजले जाते. महाणुभाव भक्तांची या ठिकाणी वर्षभर वर्दड रहाते. येथील कृष्णांची मुर्ती अप्रतीम  आहे. यापर्वतात ससारक्षण संस्था असुन येथेही मोठ्या प्रमाणात महाणुभाव दररोज हजेरी लावतात. सन १९२५ दरम्यान या ठिकाणी राष्ट्रसंत तुकोडोजी महाराजांनी महायद्न्य केला होता. आज येथे राष्ट्रसंताचे  प्रशस्त देखणे मंदीर आहे. या ठिकाणी शिवराञीच्या पर्वावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शिवगुफेत जातांना हनुमानाची कोरीव मूर्ती आहे. शिवभक्तांना पायर्‍या चढत चढत शिवगुफेपर्यंत जावे लागते. ह्या शिवगुफा जमिनीपासून १६५ मीटरपेक्षा जास्त उंचावर स्थित आहे. आख्यायिका अशी आहे की, शिवगुफेतुन आणखी तीन ते चार गुफा आहेत ज्या सरळ पंचमढी पर्यंत आहेत. ह्याच अतिरम्य परीसरात सुप्रसिद्ध दिवंगत मराठी अभिनेते दादा कोंडके ह्यांच्या एका चिञपटाचे चिञिकरण सुद्धा करण्यात आले होते.
      अशा ह्या हिरव्यागार, विशाल दगडांच्या पर्वतरांगातील अद्भुत निसर्ग रम्य वातावरणातील "शिवराञी सालबर्डी याञेच्या" निमित्ताने मिळालेला अनुभव पर्यटकांसाठी नक्कीच पर्वणी ठरेल ह्यात काहीच शंका नाही.

-किशोर तळोकार



No comments: