Sunday, 1 October 2017

लाल बहादूर शास्री

लाल बहादूर शास्री
मुर्ती लहान पण किर्ती महान
 
      "जय जवान जय किसान" हा मुलमंत्र देशाला देणारी महान विभुती म्हणजेच लाल बहादूर श्रीवास्तव उर्फ शास्री. शास्रीजींची दुरदृष्टी त्यांनी दिलेल्या मुलमंत्रात दिसून येते 'जय जवान' म्हणजे आज देशात प्रचंड असुरक्षितता वाढली असतांना आपला देश हा जवानांच्या पाठबळावरच अवलंबुन आहे. तेंव्हा जवानांचं उत्थान व्हायला पाहिजे. त्यांच्या परिवाराच्या मान सन्मानाचा व सोई सुविधांचा राष्ट्र पातळीवर विचार केला गेला पाहिजे.
तेंव्हाच खर्या अर्थानं त्यांचा जय होईल असे वाटते. दुसरं असं की, 'जय किसान'....! आज शेतकर्यांची अत्यंत दुरावस्था आहे. निसर्गाचा समतोल ढासळल्याने व प्रचंड महागाईने शेतकर्याचं जगणं हवालदिल झालं. त्यांची माणसिकता खचलेली असतांना त्यांचा 'जय' कसा होणार...? जगण्यासाठी लागणार्या उपजीवेकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वेळी शास्रीजींच्या मंत्राची आठवण येते. तेंव्हा आज खर्या अर्थानं जवान आणि किसान ह्यांचं उत्थान होणे गरजेचे आहे.
         लाल बहादूर शास्री ह्यांचा जन्म २ आक्टोबर १९०४ मध्ये उत्तर प्रदेशातील मुगलसराई या गावी झाला. त्यांचे आडनाव श्रीवास्तव होते नंतर शास्त्री झाले. त्यांना जन्मत: वैभव लाभले नाही. त्यांच्या जन्मा नंतर लवकरच त्याच्या वडिलांचे देहावसान झाले. त्यामुळे त्यांच्या आईने माहेरी जावून त्यांचे संगोपन केले. त्यांचे बालपण आजोळी मामाच्या आश्रयात झाले. त्यांना संपादनाची विशेष हौस होती कॉलेजला जाण्यासाठी त्यांना रोज ५ ते १० मैलाची पायपीट करावी लागायची. कॉलेज झाल्या नंतर त्यांचा एक निश्चय होता कि नोकरी न करता समाजसेवा करायची. त्या वेळी लाला लजपतरायांनी गोखल्यांच्या धर्तीवर ‘लोकसेवक समाज’ संस्था काढली व त्या द्वारे शास्त्रीजींनी अस्पृश्योध्दाराचे काम सुरु केले. स्त्रियांची स्वतंत्रता आणि स्वदेशी हि त्यांची व्रते होती. १९२७ साली ललितादेवी यांचेशी त्यांचा विवाह झाला. त्यांचा संसार त्यांनी उत्तम रितीने केला. आपला पती लोकसेवक आहे. त्याकरिता शास्त्रीजींचा वेळ संसाराच्या व्यापात जावू नये यासाठी त्या दक्ष होत्या. ते देशासाठी ठिकठीकाणी जावून आले तिथे तिथे आपल्या मृदू व निश्चयी शब्दांनी ती आपली छाप पाडीत. आणि आपल्या देशात काय उणे आहे दुसर्या देशापासून काय घेण्या सारखे हे त्या प्रमाणे स्वदेशी परतल्या नंतर ते कामाला लागत. २७ मे १९६४ ला नेहरूजी गेल्या नंतर देशाची सर्वस्वी जबाबदारी लाल बहाद्दूर शास्त्री यांचेवर आली. त्यांनी आपल्या कृतीने माणसाचे शील व निश्चय किती प्रभावशाली असू शकतात हे त्यांनी स्वत:वरून दाखविले.
        लाल बहादूर वयाच्या अकराव्या वर्षीपासून विदेशीवर बहिष्कार, स्वदेशीचा वापर यातच गुंतले व त्यातून सुटताच पुन्हा विद्यापीठात दाखल झाले. व काशी विद्यापीठाचे 'शास्त्री' झाले. 'सर्व्हटस ऑफ दि पीपल्स' सोसायटीचे सदस्य झाले. शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होते. सोबत समानतेचे सूत्र होते. इ.स. १९२८ साली लाला लजपतराय गेले व ते पुरूषोत्तमदास टंडन सोसायटीचे अध्यक्ष झाले.
       शास्त्रीना काँग्रेसचे मवाळ धोरण मान्य नव्हते. इ.स. १९३७ मध्ये सत्याग्रह करून ते कारावासात गेले. सत्तेची लालसा नव्हती; पण इ.स. १९४६ साली निवडणुका झाल्या. ते गोविदवल्लभ पंतांचे सेेक्रटरी झाले. पंत गेल्यावर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. इ.स. १९५१ साली मध्ये त्यांनी पं.जवाहरलालजींनी त्यांना काँग्रेसचे सचिव केले. इ.स. १९५७ मध्ये त्यांनी काँग्रेसला निवडणुका जिंकून
दिल्या. २७ मे, इ.स. १९६४ ला नेहरू गेले. त्यानंतर लालबहादूर एकमताने पंतप्रधान झाले. पाकिस्तानला ही सुसंधी वाटली. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. 'जय जवान, जय किसान' हा घोषणामंत्र वातावरणात निनादला. भारताने पाकिस्तानला नमविले. युनोने युद्धबंदी केली. रशियाने मध्यस्थी केली. १० जानेवारी, इ.स. १९६६ रोजी ह्रदयविकाराच्या तीव्र झटल्याने त्यांची जीवनज्योत मालवली. त्यांनी देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.
        शास्त्रीजी चे संपूर्ण जीवन हीच एक आदर्श आचार संहिता होय. त्यांच्या अंगच्या अनेक गुणांचा प्रत्यय आज पर्यंत अनेक वेळा आला असला तरी या वामन मूर्तीने अनेक धैर्यशाली मार्गदर्शन भारताला केले. त्याने सारे जग स्तिमित झाले आहे.भारताची मान जगात उंचावली. ”जय जवान जय किसान” या शास्त्रीजींच्या नव्या घोषणेत त्यांच्या देश विषयक खंबीर धोरणाचे पडसाद उमटले.
म्हणुन असे म्हणावेसे वाटते.......
”या देशाच्या गौरोत्वाचे तुम्ही लाल खरोखर,
तुम्ही निर्मिला सुजल सुफल तो काल खरोखर !
देश सेवेचा तुमचा बाणा जरा मृदू जरा कणखर,
करी सलाम तुंम्हा भारतवासी आणि ही धरोहर !!

- किशोर तळोकार, मुर्तीजापुर ९६७३०६०७६२

No comments: