Saturday, 5 November 2016

अभ्युदय काव्य संग्रह प्रकाशित


पुस्तकाचे नाव - अभ्युदय (काव्यसंग्रह)
लेखक/कवी - किशोर तळोकार ९६७३०६०७६२ 
प्रकाशन - शिक्षक साहित्य संघ राज्यस्तरीय साहित्य संमेलन पाचवे,नागपूर  दि. १३ नोव्हेंबर १६ 
मूल्य - ८०/- रु 
पुस्तकासाठी संपर्क करा (सवलतीच्या दरात उपलब्ध घरपोच) - किशोर तळोकार ९६७३०६०७६२ 


थोडं मनातलं 

       रोज सुर्योदयाच्या आगमनाने सुरेल पहाट होते आणि दिवसाचा नित्यक्रम सुरु होतो. अगदी नेहमीचाच..! पण फार वेगळा अनुभव देणारा प्रत्येक दिवस असतो. जीवन जगतांना प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात चांगले वाईट अनुभव येतातच. आणि त्या अनुभवाच्या रेषा त्याच्या व्यक्तीमत्वावर कायम कोरून जातात. आणि त्याची व्यक्तिरेखा घडत जाते. माझ्याही आयुष्यात असेच काही क्षण आले कधी हसरे तर कधी रडके हे सारे सुख दुखाचे क्षण कागदावर गिरवण्याचा मोडका तोडका प्रयत्न करत गेलो. जीवनाच्या  वाटेवर अपेक्षांचं ओझं पेलत अनुभवाचे गोंदण करत गेलो. कधी माझी प्रिय मैञीण माझी पत्नी प्रतिभा हिच्याशी तर कधी वृत्तपञातुन, ब्लाॅगवरून, फेसबुक आणि व्हाट्सअप वरून मिञांशी, समाजाशी  आपल्या मनातले भावविश्व शेअर करत गेलो. कुणी मला कवि म्हणाले ,कुणी लेखक तर कुणी छान लिहतोस ...लिहत जा. असे  प्रोत्साहनपर आशीर्वादही दिले. कळलेच नाही कधी ह्या मनातल्या सामाजिक जाणिवा, तिच्यामुळे आलेली प्रेमाच्या नात्यातली समज अशा काव्यरूपात प्रकाशित करण्याचा योग येईल. सगळं काही अनपेक्षित चिञ आता डोळ्यासमोर उभं आहे. नोकरीच्या आधी नाटकाचं अभिनयाचं नृत्याचं प्रचंड वेड डोक्यात असतांना एक यशस्वी कलाकार होण्याचं स्वप्न पहाता पहाता कधी साहित्यिक झालो माझे मलाच कळले नाही. घरापासुन गेल्या दहा बारा वर्षापासुन दूर राहून बराच दुर गेलो की काय असंही कधी वाटायचं..! तेंव्हा ह्या एकाकी पणाला लेखणीची साथ मिळाली. कागदावर संवेदनांच्या ओल्या खुणा अन् वास्तव रेखाटत गेलो. आणि आज हा काव्यरूपात माझ्या लेखणीचा अभ्युदय होतांना मन आकाशात स्वछंद गिरक्या घेवु पहात आहे. आतला आवाज असा मोठ्या स्वरूपात व्यक्त करतांना आनंद होतो आहे. थोडी मनात धाकधूक वाटत होती पण शेवटी ठरवलंच.!
  
    "माझ्या मना मनाशी संवाद फार केले,
     आता लिहून थोडे वीवाद फार केले।"

        मिञहो माझ्या प्रेम आणि सामाजिक वास्तव्याच्या जाणीवेतला हा मुक्तछंद काव्य संग्रहाला साजेसं नाव देतोय "अभ्युदय." अभ्युदय म्हणजे समज अस्तीत्वाची. सुरूवात नव्या विचाराची. आशा नव्या उदयाची. असं गोंडस नाव संग्रहाला द्यावसं वाटलं.
     प्रेमातली पहिली भेट, पहिली नजर, पहिला गारवा, पहिली हाक अशा सर्वांच्या मनाला साद घालणार्या, मनातल्या भावना मांडणार्या तर काही कविता समाजात घडणारे प्रसंग ज्याने मन आतल्या आत आक्रोश करायला लागतं, निशब्द करणार्या घटना त्यातले वास्तव शब्दबध्द करण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या ब्लाॅगवर, फेसबुकवर आणि वृत्तपञांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळालेल्या काही निवडक कवितांचा संग्रह आपणा सर्व वाचक रसिक मिञांसाठी सस्नेह सादर करीत आहे. आपणा सर्वांना प्रत्येक कविता आपल्या मनातली हाक वाटेल असे अपेक्षित करतो.

       पहाटेचा प्रहर धुक्यात माखला,
       डोळ्यात स्वप्नांचा काहूर दाटला ।
       जिंकण्याचा विश्वास उरातजागला,
       अभ्युदय जीवनाचा उद्देश आखला                                                                                                                                                     
                                                   - किशोर तळोकार 




No comments: