Monday, 6 September 2021

महात्मा गांधीजींचे शिक्षणविचार

 ◾महात्मा गांधीजींचे शिक्षणविचार !

[राष्ट्रातील प्रत्येक घर ही शाळा आहे. आणि घरातील मातापिता हे शिक्षक आहेत. - महात्मा गांधी ]

     आज महात्मा गांधीजींची १५२ वी जन्मशताब्दी संपुर्ण भारतभर उत्साहाने साजरी केली जाते. त्यांचा जन्म पोरबंदर येथे २ ऑक्टोंबर १८६९ रोजी झाला. सत्य आणि अहिंसा ह्या दोन तत्वांच्या पलीकडेही गांधीनी देशाला मौलिक विचाराची देण दिली आहे. महात्मा गांधी हे आधुनिक विचारसरणीचे होते. बदलत्या काळात विचारप्रवाह सुद्धा त्याला सुसंगत असावे असे त्यांचे मत होते.  खरंतर त्यांनी आचरणात आणलेली जीवनशैली अत्यंत श्रेष्ठ आहे. त्याच प्रमाणे त्यांनी मांडलेली शिक्षण विचारधारा अत्यंत जीवनाभिमुख, कृतिशील व व्यवहारी आहे. गांधीजीच्या मते शिक्षण म्हणजे "शरीर, मन आणि आत्मा यांचा विकास होय." केवळ साक्षर होणे म्हणजे शिक्षण नव्हे ; त्यांच्या मते व्यक्तिमत्वाचा संपुर्ण विकास साधने हेच शिक्षणाचे ध्येय्य असले पाहिजे. थोडक्यात महात्मा गांधींच्या विचार प्रणालीनुसार "शिक्षण म्हणजे माणूस घडविणे होय !"

       गांधीजींच्या जीवनविषयक तत्वज्ञानाचे व्याहारिक स्वरूप म्हणजे त्यांचे शिक्षण विषयक विचार होय. गांधीजींच्या शैक्षणिक विचारात निसर्गवाद, आदर्शवाद व कार्यवाद यांचा समन्वय साधलेला दिसून येतो. गांधीजींनी पुस्तकी ज्ञानाला महत्व न देता कृतीद्वारे शिक्षणाचा पुरस्कार केला. मनुष्याचा सर्वांगिण व समतोल विकास साधण्याच्या दृष्टीने शिक्षणाचा विचार स्विकारावा हे कृतीतुन त्यांनी दाखवून दिले. 

      महात्मा गांधीनी आपले शिक्षण विषयक विचार हरिजन ह्या साप्ताहिकातून मांडले. त्यांच्या मते केवळ साक्षरता म्हणजे शिक्षणाची सुरुवात नाही तर माणसाच्या शारीरिक, माणसिक, अध्यात्मिक अंगामधील उत्कृष्टतेचा विकास व अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण होय. म्हणूनच गांधीजी साक्षरतेला सुरुवात व शेवट न मानता शिक्षणाच्या साधनापैकी एक साधन मानतात. 

     सर्वात प्रथम फिनिक्स आणि टॉलस्टॉय आश्रमात गांधीजीने शिक्षणाचा विचार केला. आश्रमात राहणारे त्यांचे कार्यकर्ते, सत्याग्रही, अनुयायी यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी कळत नकळत गांधीजींवर आली आणि आश्रमातच शिक्षणाचे प्रयोग सुरू झाले. तिथे त्यांनी शाळा चालवल्या. भारतामध्ये गांधीजी जेव्हा आले तेव्हा ते म्हणाले, स्वतंत्र भारतासाठी शिक्षण सुद्धा स्वतंत्र हवे आणि त्याचे स्वरूप कसे असावे याकरीता वर्धा येथे १९३८ साली शिक्षण परिषद बोलावल्या गेली. जमनालाल बजाज ह्यांनी पुढाकार घेतला. या शिक्षण परिषद मध्ये जाकीर हुसेन, आचार्य विनोबा भावे, आचार्य काकासाहेब कालेलकर, जगतराम देवीप्रसाद असे शिक्षणतज्ञांसमवेत शिक्षण परिषदेचे मुख्य नेतृत्व महात्मा गांधी करत होते. शिक्षणातुन स्वावलंबनाचे धडे मिळावे. शिक्षणाला व्यवहाराची व कृतीची जोड मिळावी ह्यासाठी मुलोद्योगी शिक्षणाची संकल्पना वर्धा येथे झालेल्या शिक्षण परिषदेमध्ये मांडली. 

       गांधीजींनी आपल्या शिक्षणविषयक विचारांची कार्यवाही मुलोद्योगी शिक्षणातून केली. मुलोद्योगी शिक्षणाला वर्धा शिक्षण, जीवन शिक्षण, बुनीयादी शिक्षा किंवा नयी तालीम इत्यादी नावाने ओळखल्या जाते.  ही शिक्षण पध्दती जीवनाभिमुख होती आणि स्वालंबन स्वाभिमान व श्रमप्रतिष्ठा या तीन सुत्रांवर आधारीत होती. 

       ही शिक्षण विषयक संकल्पना भारतीय संस्कृतीवर आधारलेली असुन या योजनेत विद्यार्थ्याच्या मुलभूत गरजा व आवडींचा जवळचा संबंध असेल. या शिक्षणातून आजुबाजूच्या वातावरणाचे ज्ञान विद्यार्थ्यास प्राप्त होईल. विद्यार्थ्यांना हस्तउद्योगास शिक्षण येथे दिले जाईल. ज्यामुळे तो त्याच्या जीवनातील उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम बनेल. शिक्षण हे स्वाश्रयी असावे. विद्यार्थ्यांनी शाळेत निरनिराळ्या वस्तू तयार कराव्यात व त्या वस्तू विकून जो पैसा येईल त्यातून शाळेचा खर्च अंशत: भागवला जावा. हे मुलोद्योगी शिक्षण पध्दतीचे वैशिष्ट्ये होते. महत्वाचे म्हणजे शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे. आणि ७ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांना सक्तीचे शिक्षणाद्वारे शिक्षण मोफत असावे. 

■ मुलोद्योगी शिक्षण पध्दतीचे उद्दीष्ट्ये  

१) लोकशाही शासन पध्दतीमध्ये सुजान नागरिकाची भुमिका महत्वपुर्ण असते. शाळांमधून बालकांना आदर्श नागरिकत्वाचे धडे मिळावेत. आर्थिक, राजकिय, सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या आदर्श नागरिक निर्माण व्हावेत यासाठी मुलोद्योगी शिक्षण व्यवस्थेची मदत होईल. 

२) आर्थिक स्वावलंबना अंतर्गत विद्यार्थी व संस्था यांचा विकास अभिप्रेत आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तुंमधून संख्येच्या खर्चातील काही भाग भरून काढणे व शिक्षण पूर्ण केल्या नंतर विद्यार्थ्याच्या उदर्निवाहची गरज भागविणे अशा दुहेरी दृष्टीकोनातून आर्थिक स्वावलंबनाचे उद्दीष्ट होते. 

३) व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास म्हणजे सर्वोदय समाज ! जो समाज दोष व दुष्प्रवृत्तीपासून मुक्त असेल अशा समाजात त्याग, सहकार्य, सेवाभाव आत्मविश्वास आणि प्रेम अशा गुणांनी मुक्त व्यक्ती असलेल्या श्रमाला महत्व असेल. 

४) विद्यार्थी ज्या गोष्टी शिकत आहे त्याचा संबंध घर, गांव आणि आजुबाजूच्या परिसराशी असणे गरजेचे आहे. शिक्षणाद्वारा जीवनाशी समन्वय साधने गरजेचे आहे. 

■ मुलोद्योगी शिक्षणाची अध्यापन पध्दती

१) कृतीद्वारे शिक्षण : गांधी म्हणत खरे बौध्दिक शिक्षण हे शरीर अवयवांच्या हात, पाय, डोळे, नाक इत्यादी च्या योग्य वापरातून होऊ शकते. विशेषत: प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासासाठी या पध्दतीचा अवलंब करण्यात यावा. 

२) स्वानुभवातून शिक्षण : बालक जेवढे अधिक स्वानुभव घेत जाईल तेवढेच त्याचे ज्ञान अधिक व्यापक होत जाईल. म्हणून जीवनाशी निघडीत असे अनुभव देऊन त्या अनुभवाद्वारे शिक्षण दिले जावे.

३) शिक्षणाच्या माध्यमातुन जीवनाशी समन्वय साधणे हे या शिक्षण पध्दतीचे वैशिष्ट्ये होते. त्यामुळे शिक्षणामध्ये अभ्यासल्या जाणाऱ्या विषयाचा जीवनाशी घनिष्ठ संबंध असावा. असे गांधी मानत. विषयाचे प्रथक ज्ञान देण्याऐवजी ज्ञान हे एक संध असावे अशा आंतर विद्याशाखीय शिक्षणाचे गांधी पुरस्कर्ते होते. या शिक्षण योजनेनुसार ज्या भागात शाळा असेल त्या भागातील व्यक्तिचीच शिक्षक म्हणून नेमणूक करण्यात यावी असे अपेक्षित आहे. यासाठी प्रशिक्षित शिक्षकांना प्राधान्य देण्यात यावे असे नमूद केेले आहे. महात्मा गांधी हे बालकेंद्रीत शिक्षणाचे समर्थक होते. त्यांच्या तत्वानुसार शिक्षणप्रक्रियेत शिक्षकांचे स्थान मार्गदर्शक मित्र असे आहे. शिक्षक हा सहिष्णू, धैर्यशील, त्यागी, व उदारऱ्हदयी असावा. 

       आजच्या शिक्षण पध्दतेनेही मुलोद्योगी पध्दतीतील विचार स्विकारले आहेत. कृतीद्वारा शिक्षण व्यावसायिक शिक्षण समन्वय या तत्वांचा आज शिक्षणात अवलंब केला जातो. मुलोद्योगी शिक्षण योजना भारतीय शिक्षण प्रणालीला मिळालेली एक मौलिक भेट आहे. भारताच्या शिक्षण प्रणालीत अमुलाग्र बदल करण्याच्या हेतूने गांधीजींनी ही योजना मांडली. भारतीय कृषीधारीत अर्थव्यवस्था असल्याने कृषीला पुरक हस्त उद्योगाचे शिक्षण विद्यार्थ्यास दिले तर मनुष्यबळाचा योग्य वापर होऊन देशाच्या आर्थिक विकासालाही हातभार लागेल. असा गांधीजीचा कयास होता. अध्यात्मवाद निसर्गवाद कार्यवाद अशा त्रिवेणी संगमाचा अंगिकार असणारी ही योजना गरजाधिष्ठीत अभ्यासक्रमानुसार आधारीत होती. जगातील सर्वात उत्तम शिक्षण पद्धती ही फिनलँड देशाची मानली जाते. ह्या देशाची शिक्षण तत्त्वे मुलोद्योगी ह्या महात्मा गांधीजींच्या शिक्षण तत्त्वाशी मिळते त्यामुळे अशा परिणामकारक शिक्षण पध्दतीची समाजाला गरज आहे. ज्यातुन शिक्षणातुन निर्माण होणारी 'बेरोजगारी' सारखी भयानक समस्या थांबवता येईल. 

■ किशोर तळोकार | ९६७३०६०७६२

 ==========

Wednesday, 10 March 2021

शिवाजींचा छावा | धर्मवीर संभाजी

 ■ शिवाजींचा छावा | धर्मवीर संभाजी

      "श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरीव राजते, यंदकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरी" शिवपुत्र श्री शंभु राजे यांची राजमुद्रा सूर्याच्या तेजाप्रमाणे आकाशी शोभते आहे लोकांच्या कल्याणाकरिता तिचा अंमल सर्वत्र गाजणारा आहे त्यासाठी ही मुद्रा सदैव प्रकाशमान आहे !
     मराठी बाणा काळजात आणि प्रत्येक मराठी माणसाच्या नसानसात भिणवणारा छत्रपती शिवाजींचा छावा, धर्मवीर, स्वराज्यरक्षणकर्ते, संस्कृत भाषेचे पंडित आणि अशी अनेक नामाबिरुदे मिरवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांचा ११ मार्च हा बलिदानदिन आहे. अनन्वित अत्याचार सहन करूनही धर्मांतर करण्यास स्पष्टपणे नकार देणारे धर्माभिमानी असणारे संभाजी महाराज एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते. अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा करून शिवाजी महाराजांनंतर सलग ९ वर्ष संभाजी महाराजांनी स्वराज्य टिकवले. मुघल, आदिलशहा, सिद्दी, पोर्तुगीज आणि अंतर्गत शत्रूंचा छडा लावत त्यांना चांगलेज झुंजवले. राजकारण, मुसद्देगिरी, समाजकारण, धर्मकारण यांच्यात मुरलेले संभाजी राजे रणांगणावरचे शेर होते. स्वकीयांनी फितुरी केली नसती, तर संभाजी राजे केव्हाच कुणाच्या हाती लागले नसते. वादळाप्रमाणे शत्रूवर चाल करून जायची, त्यांची पद्धत अजब होती.
       छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे सुपुत्र असल्याने रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजी राजे अभ्यासात अत्यंत हुशार होते. अनेक भाषा त्यांनी आत्मसात केल्या होत्या. संस्कृत भाषेवर विशेष प्रभूत्व मिळवले होते. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला. याशिवाय नाईकाभेद, नखशिखा, सातसतक या ग्रथांची निर्मिती केली. संभाजी महाराजांचे सल्लागार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कवी कलश यांच्याशी राजेंची मैत्री ही साहित्यामुळे अधिक घट्ट झाली, असे सांगण्यात येते. एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात लेखणी घेऊन इतिहास घडविणारे आणि इतिहास लिहिणारे संभाजी महाराज होते.
      छत्रपती संभाजी महाराज हे राज्यकारभारातही अत्यंत निपूण होते. कुशल संघटक होते. शिवाजी महाराजांप्रमाणे छत्रपती झाल्यावर संभाजी महाराजांनीही अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली होती. यामध्ये पंतप्रधान म्हणून निळोपंत पिंगळे, चिटणीस म्हणून बाळाजी आवजी, सेनापती म्हणून हंबीरराव मोहिते, न्यायाधीश म्हणून प्रल्हाद निराजी, डबीर म्हणून जनार्दन पंत, पंडितराव दानाध्यक्ष म्हणून मोरेश्वर पंडितराव, सुरनीस म्हणून आबाजी सोनदेव, वाकेनविस म्हणून दत्ताजी पंत, मुजुमदार अण्णाजी दत्तो यांना नेमले होते.
       संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठीही भरपूर कामे केली. एवढेच नव्हे तर संभाजी महाराजांच्या धार्मिक धोरणांवरही छत्रपती शिवाजी महाराज यांचा ठसा कोरलेला आढळतो. समर्थ रामदास स्वामींना मिळालेल्या राममूर्तीची चाफळ येथे स्थापना करून मंदिर उभारले. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे पुत्र महादोबा गोसावी, मोरया गोसावी, समर्थ रामदास, सदानंद गोसावी यांना शिवाजी महाराजांनंतरही सर्वतोपरी मदत केली. यासह अनेकांना त्यांनी सढळ हस्ते मदत केल्याचे अनेक दाखले आपल्याला देता येतील. छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या काही दानपत्रावरून त्यांच्या संस्कृत ज्ञानाविषयी माहिती मिळते. संभाजी राजेंनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला. तीन भागांतील बुधभूषण या ग्रंथात काव्यालंकार, शास्त्रे, संगीत, पुराणे, धनुर्विविद्या यांचा अभ्यास केल्याचा उल्लेख आहे. तसेच राजा आणि त्याचे गुण, राजाचे मदतनीस, राजाचे सल्लागार, राजाची कर्तव्ये, राजसभा, मुख्य प्रधान राजपुत्र, त्यांचे शिक्षण, त्यांची कर्तव्ये, कोश, दुर्ग, सैन्य, हेर, नोकर, वगैरेंची माहिती दिली आहे. याशिवाय गागाभट्टांकडून नीतिपर 'समयनय' हा ग्रंथ संभाजी राजेंनी लिहून घेतला. 'धर्म कल्पलता' हा धर्मशास्त्रावरील गंथ केशव पंडिताने संभाजीराजांसाठी लिहिला. युद्धकलेतील नैपुण्याबद्दल ॲबे कॅरे या परकीय लेखकाने संभाजी महाराजांची प्रशंसा केली आहे. यावरून संभाजी महाराजांच्या अफाट बुद्धी, ज्ञान, अनेक भाषांवरील प्रभुत्व, धर्माभिमान याचा अंदाज लावता येऊ शकतो.
       छत्रपती शिवाजी महाजांनंतर संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली. स्वराज्य विस्तारण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले. गनिमी काव्याचा चपखलपणे वापर करत शत्रूंना झुंजवले. छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे १२० युद्धे केली. मात्र, एकाही लढाईत ते कधीही पराभूत झाले नाहीत. संभाजी राजेंची शत्रूवर चाल करून जायची पद्धत वादळी होती. संभाजी राजांना टक्कर देणारा योद्धा तत्कालीन हिंदुस्थानात नव्हता. शत्रूला ते कधीही सापडले नाहीत. मात्र, स्वकीयांनी टाकलेल्या फितुरीच्या जाळ्यात संभाजी महाराज अडकले आणि कैद झाले. १६८९ च्या सुरवातीला छत्रपती संभाजी राजेंचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वरवर हल्ला केला. मराठ्यांत आणि शत्रूचे सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. परिणामी शत्रूने संभाजी महाराजांना जिवंत पकडण्यात मोघलांना यश आले. संभाजीराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबापुढे बहादुरगड येथे नेले. संभाजीराजांनी धर्मांतर केल्यास जीवदान देण्याची अट औरंगजेबाने घातली होती. मात्र, संभाजी राजेंनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाचे अनन्वित अत्याचार असह्य होऊन सुमारे ४० दिवसांनी फाल्गुन अमावास्या म्हणजेच ११ मार्च १६८९ रोजी संभाजी महाराजांची प्राणज्योत अखेर मालवली. असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर हे पदवी बहाल केली.

■ लेखक : किशोर तळोकार | ९६७३०६०७६२
■ संदर्भ : छावा - शिवाजी सावंत, मृत्युंजय - नाटक, धर्मवीर संभाजी - ग.कृ. गोडसे (नाटक), विकीपिडीया साभार

Saturday, 20 June 2020

साहित्यातला किमयागार : विल्यम शेक्सपिअर



      एखाद्या लेखकाने माणसाच्या भावछटा रंगवण्यामध्ये जागतिक विक्रम करावा एवढं दिव्यलेखन करणाऱ्याला किमयागारच म्हणावं लागेल. असा किमयागार म्हणजे विल्यम शेक्सपिअर ज्यानं माणसाच्या एवढ्या भावछटा टिपल्या आणि रंगवल्या की तेवढ्या जगाच्या इतिहासात कोणीच रंगवल्या नसतील. सुप्रसिध्द लेखक 'अँथनी बर्जेस' म्हणतो की, "आपण जेंव्हा शेक्सपिअर वाचतो, तेंव्हा खरं तर ते एखाद्या आरशासमोर उभं राहण्यासारखं असतं. आपण शेक्सपिअरला वाचत नसतो, तर शेक्सपिअरच उलट आपल्याला वाचत असतो." ह्या साहित्यातल्या किमयागाराने आपल्या साहित्यात हास्य, शोक, शृंगार, बीभत्स, रौद्र, भीती वगैरे सगळेच रस आणि त्यात मानवी भावना़ंचं वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चित्रण केलंय. जसे ' ऑथेल्लो' आणि 'दी विटर्स टेल' मध्ये दिसणारा संशय आणि मत्सर. 'मॅक्बेथ' मधली टोकाची महत्वाकांक्षा, 'लियर' मधला हट्टीपणा, 'हॅम्लेट' मधला अविचार, सुड आणि अतिविचार (द्विधा मनस्थिती), 'अँटनी' मधली काममोहिनी या भावना शेक्सपिअरनं लिलया हाताळल्या आहेत. असे असुन सुध्दा लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यापर्यंत त्यांच्या स्वभावातली जी इनसाईट मांडणी केलीय ती कमालीची आहे. हे करत असतांना त्यानं शेकडो स्वभावरेषा अजरामर केल्या. हॅम्लेट, लियर, ऑथेल्लो यांच्यासारखे नायक, शॉयलॉक, एडमंड, इयॅगो यांच्यासारखे खलनायक, पोर्शिया, क्लिओपात्रा, क्रेसिडा, इझेबिला यांच्यासारख्या नायिका आणि फॉल्स्टाफ, मॅलव्होकीयो यांच्यासारखी विनोदी पात्रं अतिशय ताकदिनं मांडलीय. यांच्या विषयी अजूनही विश्लेषणं आणि वादविवाद चर्चा सुरूच आहेत जसे फाॅल्स्टाफ हा शुर होता की भित्रा..? इत्यादी. 
       विल्यम शेक्सपिअरच्या ह्या अद्वितीय लेखन सामर्थ्यावर अनेक टिकाकारांनी, चाहत्यांनी आपल्या लेखनी खर्ची घातल्या आहेतच. त्यामध्ये काही सकारात्मक तर काही नकारात्मक कंगोरेही आहेत. त्याचाच समकालीन मित्र, प्रतिस्पर्धी बेन जॉन्सनने म्हटले आहे की, "शेक्सपिअर हा युगाचा किंवा काळाचा नव्हता तर तो अनंत काळ टिकणारा होता" तर टॉलस्टॉयने "शेक्सपिअरच्या लिखाणात वाईट गोष्टीचं चित्रण आहे, अनैतिकता आहे. अधार्मिकता आहे आणि त्याची भाषा कुत्रीम आहे. तेंव्हा लोकांनी शेक्सपिअरच्या वेडगळ स्तुतीतून, पुजणातून लोकांनी लवकर बाहेर यावे, त्याची सर्व नाटकं विसरून जावे" अशी टिका केली असली तरी आतापर्यंत चारशे चार वर्षे झाली तरी त्याच्या नाटकांची मोहिनी उतरली नाही.

     विल्यम शेक्सपीअरच्या जन्माची आणि मृत्यूची तारीख २३ एप्रिल हेही कमालच..!  ह्या अजरामर सुनीतं लिहणाऱ्या साहित्यिकाचं स्मरण हेतू 'जागतिक काव्य दिन'  जगात साजरा केल्या जातो.  विल्यमचा मृत्यू १६१६ मध्ये झाला आज चारशेचार वर्षे होत आहेत. शेक्सपिअर केवळ ५२ वर्षे जगला. मात्र, तो मरण पावल्यानंतर इंग्लंडला त्याची महती कळली होती. यश, कीर्ती आणि पैसा सारे त्याच्याकडे धावत होते. मृत्यूनंतर गेल्या चार शतकांत शेक्सपिअर पोहोचला नाही, असा जगाच्या पाठीवर एकही भूभाग नसेल जिथे त्याची नाटके, सुनीते किंवा अशी एकही आधुनिक भाषा नसेल की ज्यात दीर्घ कवितांचा अनुवाद झाला नाही, कळत नकळत शेक्सपिअर सर्व सुसंस्कृत विश्वाला व्यापून उरला आहे. गेल्या चारशे वर्षातलं कुठलंही नाटक, सिनेमा किंवा कथा कादंबऱ्या बघितल्या तर त्यात कुठे ना कुठे तरी दुरून का होईना शेक्सपिअर डोकावतांना दिसेलच. एवढ्यात मराठीत आलेला ‘नटसम्राट’ हा चित्रपट मूळ ज्या नाटकावरून आला ते वि. वा. शिरवाडकर यांचे नाटक हे शेक्सपिअरला प्रभावित होऊनच लिहिलेले होते. विशाल भारद्वाज यांनी शेक्सपिअरच्या नाटकांच्या कथा मनात ठेवून 'मकबूल', 'ओंकारा'.. असे अनेक चित्रपट काढले. गुलजार यांनी दिग्दर्शन केलेला ‘अंगुर’ हा हिंदी सिनेमा ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या कादंबरीवरून आला असला तरी मुळात ती कादंबरी शेक्सपिअरच्या ‘द कॉमेडी ऑफ एरर्स’ या नाटकावरून घेतली होती. मराठीतले पहिले आधुनिक मानले जाणारे ‘सवाई माधवरावाचा खून’ हेही नाटक शेक्सपिअरच्या प्रभावातून जन्मले. हे असे जगातल्या प्रत्येक आधुनिक भाषेत झाले आणि होत आहे. लिहिणाऱ्या, वाचणाऱ्या किंवा नाटक-सिनेमे पाहणाऱ्या रसिकांना इतका दीर्घकाळ गुंतवून ठेवणारा दुसरा लेखक पृथ्वीच्या पाठीवर आजवर कुणी झाला नसेल. ह्याचं सुंदर उदाहरणुत्तर विंदा करंदीकर यांनी ‘तुकोबाच्या भेटी शेक्सपिअर आला..’ या कवितेत दिले आहे. ते म्हणतात, ‘तुका म्हणे, ‘विल्या, तुझे कर्म थोर। अवघाचि संसार। उभा केला।’ हा ‘अवघाचि संसार’ मानवी भावभावनांचे तळ शोधणारा होता. विश्वासाने खांद्यावर मान टाकलेला मित्र आपल्या खुनाच्या कटात दिसतो, तेव्हा ज्यूलियस सीझरने काढलेले ‘ब्रूटस, यू टू?’ हे उद्गार गेली चार शतके विश्वासघाताच्या विश्वाचे रूप दाखवत आहेत. ३७ नाटके आणि १५४ सॉनेट्समधून आणि मराठी सुनीत यातूनही आले. शेक्सपीअरने जे विश्वदर्शन घडविले त्यात नात्यांचे पोत आणि पीळ होते. नियतीचे फटकेही होते. ‘हॅम्लेट’ नाटकात हॅम्लेट ‘दॅट वन मे स्माइल अँड स्माइल अँड बी अ व्हिलन..’ असे म्हणतो. दुटप्पीपणाचा बुरखा फाडणारे हे छोटेसे वाक्य रोजच्या रोज सारे जग अनुभवते आहे. शेक्सपिअरच्या मोहिनीचे गूज उलगडण्याचा प्रयत्न हजारो अभ्यासकांनी केला. आजही चालू आहे. त्यांत मानसशास्त्रज्ञ ते संस्कृतीचे अभ्यासक व भाषाशास्त्रज्ञ ते राज्यशास्त्रज्ञ असे सारेच आहेत. इंग्रजांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नव्हता, म्हणून शेक्सपिअर कायम उजेडात राहिला, अशी टीकाही होते. शेक्सपिअर हे नावही माहीत नसताना त्याची विविध मार्गांनी पोहोचलेली कलाकृती रसिक जेव्हा डोक्यावर घेतात. ह्यातच त्या लेखकाच्या लेखणीचं दिव्य लक्षात येतं.. विविध भाषांमधील लेखकांनी कितीही लेखन केले असले तरी अनेक शतकांपर्यंत शेक्सपिअर हा लिहणाऱ्यांच्या भावछटांतून जीवंत राहिल ह्यात शंका नाही...साहित्य क्षेत्रातल्या ह्या अजरामर कलाकृतीला सलाम..!

■ लेखक : किशोर तळोकार ९६७३०६०७६२
===============================
》संदर्भ : 
▪ झपूर्झा - अच्युत गोडबोले
▪ वृत्तपत्रे टिकात्मक परिक्षणात्मक लेख - लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स
▪ विल्यम शेक्सपिअरचा मराठी लिट्रेचर मधील नाटकांचा काही भाग

Thursday, 28 May 2020

कोसला : एक अभिजात लेखनकृती

कोसला : अभिजात लेखनकृती
                   □ किशोर तळोकार ९६७३०६०७६२
     गेली कित्येक वर्षे वाचनाला चांगलाच खंड पडलेला.. आणि वाचावं असं काही गवसलं नाही.. जे आहे त्याला वाचायला मननिवांत क्षणही नाही... रोजची धावपळ आणि प्रचंड व्यस्त करून ठेवलेली दैनंदिनी त्यामूळे बरच काही चांगलं वाचायचं सुटून जात होतं. ह्याची खंतही मनामध्ये घर करून बसली होती.. लॉकडाऊनचा योग आणि घरी बसून कोरोनाशी युध्द सुरु असतांना 'कोसला' गवसला. आधीच साहित्यातल्या सारस्वतांनी ह्यावर लेखणी सार्थकी लावल्या आहेच. टिकात्मक, सकारात्मक प्रतिक्रियाही लिहल्या असतांना इतक्या अभिजात कलाकृतीवर माझ्यासारख्यानं लिहणं म्हणजे सुर्याला गवसणी घालण्याचा प्रयत्न... तरीही थोडं धाडस करतो आहे. 
         ज्ञानपीठ पुरस्कार' विजेते लेखक भालचंद्र नेमाडे ह्यांचे     "कोसला" हे पहिले पुस्तक. ही कादंबरी त्यांनी १९६३ मध्ये वयाच्या पंचवीसाव्या वर्षी अगदीच पंधरा दिवसात लिहून पूर्ण केली. देशमुख आणि कंपनीने हे पुस्तक प्रकाशित केलं तेव्हापासून या पुस्तकाच्या चोवीस आवृत्ती आणि अनेक पुनर्मुद्रणं प्रकाशित झाली आहेत. मराठी साहित्यात "कोसला" हे मैलाचा दगड ठरलं आहे. "कोसला"वर पीएचडी करणार्यांची संख्याही लक्षणीयच.! शिवाय "कोसला"चा साहित्यिक धांडोळा घेणारी आणि त्याचं साहित्यिक मुल्य मोजू पाहणारी जवळपास १०० च्यावर पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. "कोसला"ने त्याकाळी वाचकांना वेडं केलं होतं. अजूनही प्रकाशनानंतर सत्तावन्न वर्षांनी "कोसला"ची मोहिनी पूर्णपणे उतरलेली नाही.
       मला एम ए मराठीला कोसला म्हणजे नेमाडे प्रकरण अभ्यासाला असल्याने ही कादंबरी वाचण्याची प्रचंड उत्सुकता लागली होती. मला ही कादंबरी खूप आवडली ती एका वेगळ्या अंगाने. बाकी "कोसला"ने जो इतिहास रचायचा होता तो कधीच रचला आहे. तरीही इतक्या गाजलेल्या कलाकृतीचा अनुभव कसा होता हे सांगीतल्याशिवाय चैन पडणार नाही म्हणून हा यत्न.! "कोसला"ची प्रामाणिक, मुक्त सडेतोड आणि अभिनव लेखणी शैली मला जास्त आवडली. ती देखील विशद करण्याचा थोडा प्रयत्न करतो.
      "कोसला"चे कथानक बऱ्याचअंशी सगळ्यांनाच माहिती आहे. पांडुरंग सांगवीकर हा नायक खान्देशातल्या एका अगदी लहान खेड्यातून पुण्यात फर्ग्यूसन महाविद्यालयात बीएचं शिक्षण घ्यायला येतो. त्याची कौटुंबिक, सामाजिक आणि वैचारिक पार्श्वभूमी फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या एकूण संस्कृतीपेक्षा अगदीच वेगळी आहे.  पुण्यातली जगण्याची पद्धत त्याच्या गावातल्या जगण्याच्या संकल्पनेपेक्षा अगदीच भिन्न आहे.  पांडुरंग सांगवीकर या बदलांना कसा सामोरा जातो; अपयशाचा शिक्का कपाळी बसल्यानंतर पुन्हा गावात जाऊन पांडुरंग काय काय अनुभवतो आणि त्या अनुभवांना कसा सामोरा जातो; आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक घटनेविषयी, परिस्थितीविषयी, विचाराविषयी त्याच्या मनात अगदी खोलवर कुठ्ल्याप्रकारचे सूक्ष्म तरंग उठतात आणि तो एक स्वतंत्र विचार करू शकणारी व्यक्ती म्हणून प्रत्येक प्रसंगात कसा वागतो याचं मनस्वी चित्रण म्हणजे "कोसला" ही कादंबरी होय.
       पांडुरंग सांगवीकर हे पात्र मला फार विलक्षण विनोदी वाटलं. त्यामध्ये उंदीर मारण्याच्या पराक्रमाच्या भागाचे लेखन प्रत्येक ठायी जीवंतपणा मांडून प्रसंग थेट काळजात ओतला आहे. जो प्रत्येकाला त्याच्या खोडकर मनातल्या उनाड मुलाची आठवण करून देणारा ठरतो. नायकाला उंदरांचा भयंकर राग असतो. हा राग त्यांनी प्रभावीपणे मांडला आहे. तसेच अनेक प्रसंग महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सचिवाची जबाबदारी पार पाडतांना केवळ आपल्याला भाषण देता यावं आणि चार लोकांसमोर बोलता यावं म्हणून पद स्विकारण्याचं धाडस.. त्यात घडलेल्या गंमतीजमती वाचून मला हसू आवरत नव्हते. एवढा शुध्द वेडेपणा आपणही त्या वयात केलेला आठवून जून्या आठवणींचा कप्पा हळूच उघडायला लागतो.
      दुसरे म्हणजे एखाद्या परिस्थितीची किंवा घटनेची चीड आल्यानंतर ज्या माणसिककृती आपसूक पणे मनात कोलाहल निर्माण करते आणि वाईटसाईट असे बरेचसे विचार आपल्या मनात येऊन जातात. ह्याचे अतिशय प्रभावीपणे अगदी जसेच्या तसे विचार टिपण्याचा यशस्वी प्रयत्न झाला आहे. नायकाची पाच वर्षाच्या बहिणीचा देवीमुळे झालेला करुण मृत्यू, त्यामुळे नायकाला झालेलं दु:ख, घरच्यांचा आलेला संताप, तेंव्हा त्याच्या मनाला झालेल्या वेदना अगदीच सटीकपणे चित्रित केले आहे. घर जमीनदोस्त करून टाकण्याची इच्छा होणे, वडिलांना अरे-तुरे करून त्यांच्याशी भांडणे, त्यांचा खून करण्याची इच्छा होणे, वगैरे भाव.... खूप जोरात किंचाळण्याची इच्छा होणे किंवा कुठेतरी एकसारखे वायूवेगाने पळत सुटावे असे वाटणे. 
       महाविद्यालयीन काळात केलेल्या पराक्रमातून हाती आलेल्या कर्जाची परतफेड करतपर्यंत नायकाला चैन नसतो. शेट चे २०० रूपयाची उधारी फेडत पर्यंत वार लावून जगण्याचा आणि कुठलेही फाजील खर्च न करता जगण्याचा अनैसर्गिक प्रयत्न....त्यातल्या त्यात अती जवळच्या मित्रांवरचा राग.. अगदी स्वाभाविकपणे घडत असलेल्या एखाद्या स्वतंत्र वृत्तीच्या मनाचे प्रत्येक कंगोरे इतके सहज पणे रेखाटने म्हणजे दिव्यताच..!
         सर्वात महत्वाचं म्हणजे नेमाडे ह्यांची लेखन शैलीची अजबगजब ओळख.....ती, 'उदाहरणार्थ', 'वगैरे', 'हे एक थोरच', 'हे एक भलतंच' ह्या शब्दांनी किंवा उद्गारांनी संपुर्ण कादंबरी पकडून ठेवली आहे. जे अजरामर आहे. भलेही टिकाकारांनी ह्याच त्यांच्या लेखन शैलीच्या वेगळेपणावर 'भंपकपणाचा' शिक्कामोर्तब केला असला तरीही मला त्यात भंपक किंवा निरर्थक असं काहीही वाटलं नाही. उलट प्रत्येक लेखकाची शैली असते आणि लेखणाचं वेगळंपण इतिहासात कायम कोरून ठेवणारं ठरू शकते. किंबहूना ते ठरले आहे. 
        तसे सिंहगडावर केलेली पायपीट, वेताळ टेकडीवर सुरेशबरोबर दिव्याचे रहस्य शोधण्यासाठी केलेले धाडस, मेस सांभाळण्यात नायकाला आलेले अनुभव, गावातल्या गरीब लोकांची मानसिकता.. असे बरेचसे भाग बऱ्यापैकी अंगावर येतात. या व अशा अजून काही भागांमध्ये नायकाच्या हृदयाची तगमग भाषेचे कुठलेही अलंकार न वापरता अंगावर शहारा आणनारे आहे. हे दिव्यच..!
       कोसला म्हणजे अगदी स्वच्छपणे मुक्त, उनाड, पक्षांसवे हुंदडणारं सांगवीकराचं जीवन मनाला हवंहवसं वाटून जाणारी अद्भूत लेखनकृती आहे.. त्यात आपण स्वत:ला ठेऊन जगतो.. एका अपयशी विद्यार्थ्याचे अगदी मनापासून आलेले हे प्रामाणिक आणि वास्तवदर्शी अनुभवकथन असे वर्णन लेखक "कोसला"चे करतात. नायकाच्या प्रश्नांना वाचक आपले प्रश्न समजतात. "कोसला"च्या जन्माची ही कहाणी सुरस आणि खूपच हृदयस्पर्शी आहे. एकंदरीत "कोसला"ने भारावून गेलो. अर्थात त्यातल्या अनेक असे विचारप्रवाह आहेत जे सामान्यपणे मान्य करणे म्हणजे चूकीचे ठरू शकते.. ते असे की, नायकाचे सिगरेट पिणे, खूप शिव्या देणे, वगैरे वगैरे... नायकाची म्हणजेच पांडूरंग सांगवीकराची मैत्री ही दाट कुणाशीच नसणे हेही नवलच..! परंतू जरी काही गोष्टी मनाला पटत नसेल आणि त्याही पेक्षा लेखकाच्या लिखाणाचे सौंदर्याची स्तुती न करता आपण आपल्या तत्वबुध्दीचा वापर करून त्यावर भाष्य करणे चूकीचे वाटते. नंतर हवे ते परिक्षण करायला हरकत नाही. नाहीतर नेमकं लेखकाला काय मांडायचंय आहे ह्या आशयाला व त्या कलाकृतीला आपण अनुभवू शकणार नाही. एवढेच....!!!!