Saturday, 28 March 2015

रामनवमी उत्सव.....एक मंथन..!!

....सकाळी सकाळी नेहमीचा फेरफटका मारायला निघालो.. अगदी रांगेने सगळी वाट भगव्या झेंड्यांनी सजली होती. मोठमोठी श्रीरामांची फलके लावलेली हाेती. सर्वदूर भव्य उत्सवाचे वातावरण अगदी उत्साहात तरूण मंडळी सहभागी होतांना दिसत होती. सगळीकडे वातावरण जल्लोषात न्हाहून जात होते. आज श्री रामनवमी हिंदू धर्मातील एक मोठा उत्सव. श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रित्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या दिवशी पुष्य नक्षत्रावर, माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असतांना अयोध्येत ऐतिहासिक पुराव्यानुसार ई.स.पुर्व ४ डिसें. ७३९३ रोजी तिथी चैत्र शुद्ध नवमी श्री रामचंद्रांचा जन्म झाला. एक शांत स्वभावाचा, चेहर्‍यावर सदा निस्वार्थ निरागस भाव, मर्यादा पुरूषोत्तम, एक धिरोदात्त चारिञ्यासंपन्न युग पुरूष. असा काव्यात्मक श्री रामांच्या चरिञाचा व  कार्याचा सार वाल्मीकि ऋषींनी आपल्या रामायण ह्या ग्रंथात सांगितला आहे. तर तुलसीदास ह्यांनी रचलेल्या रामचरितमाणसचे  सगळीकडे आजच्या दिवशी पठण केल्या जाते.
....आपल्या भारताला सण उत्सवाची परंपरा लाभली आहे. हा देशाचा सांस्कृतिक वारसा आहे. ज्यामागे राष्ट्रीय अस्मिता व राष्ट्रीय ऐक्यासाठी मदत व्हावी हाच उद्देश असावा असेच वाटते. पण खरचं असं होत आहे का..? हा प्रश्न मनात घर करून बसला आहे. त्याचे चिंतन व्हायला हवे. आम्ही जयंत्या पुण्यतिथ्या मोठ्या आनंदाने साजर्या करतो. पण कधी त्या त्या महापुरूषांच्या जीवन चरिञावर व त्यांच्या कार्यावर विचार मंथन करतो का?? त्यांचा भव्य उत्सव होतो. आवेशाने ज्याच्यात्याच्या धर्माच्या  अस्तीत्वाचा जणू पिटारा होतो. मग आपआपल्या धर्माच्या श्रेष्ठत्व प्रकटिकरणाची स्पर्धा सुरू होते. मुळात हेच थांबायला हवे. ह्या जगातील प्रत्येक धर्मातील आचरणाचे विचार सर्वश्रेष्ठ आहे. अन्  मानवियता ह्या एकाच कळीवर केंद्रीत आहे. पृथ्वीतलावरील सर्व माणवजात हा एकच अंश आहे त्यात प्रकार नाही,भेद नाही. जीवन जगतांना आपले आचरण मानवियतेपुर्ण असे शुध्द असावे त्यासाठी प्रत्येक धर्माने काही बंधने तर काही आचरणाचे नियम सांगितले आहेतच. फक्त ते आपल्याला मानून होणार नाही तर अंगी बाणावे लागेल. आचरणात आणावे लागेल. जे मानव हित आहे तेच कृत्य करायला पाहिजे. अन् प्रत्येक धर्मातील विचाराचा आदर करायला हवा.जिथे श्रेष्ठता आली तेथे विचार हा शुन्य होतो. मग त्यात आवेश येतो. म्हणून असे वाटते की कुठलीही जयंती उत्सव साजरे करतांना त्या त्या देव देवतांच्या, विभुतींच्या आचरणाचे अनुकरण अनुसरण व्हायला हवे. त्या दिवसापासून सर्वांनी त्या सर्वव्यापक राष्ट्रहित विचारावर प्रत्यक्ष आचरण करायचे जरी ठरवले तरी खर्‍या अर्थाने तो भव्य व यथार्थ उत्सव होईल असे वाटते. मग तो उत्सव रामनवमी असो की अजून कोणता त्याला सर्व धर्माचे लोक आदर करतील. सर्व धर्मातील लोक सर्व उत्सवात सहभागी होतील व ही बंधने हा भेदाभेद राहणार नाही. जातीय दंगले हा प्रकार येणार्‍या  पिढीला माहितही नसणार..अनेक विर महा पुरूषांनी एक भारतवर्ष घडवण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न केलेत. त्यांचं कार्य पुर्णपणे सार्थकी लागायला हवं. पुर्वजांनी मांडलेल्या श्रीरामांच्या काव्यात्मक ईतिहासाचा शब्दशः अर्थ घेण्यापेक्षा आपल्या बुद्धीच्या जोरावर समजपुर्वकरित्या तत्कालिन वास्तवाचा सापेक्ष अभ्यास करून चिंतन मनन करूया असे वाटते..
।। जयश्री राम ।।
लिखित - किशोर तळोकार
9673060762
दि. 28/03/15

No comments: